मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने यावेळी जोरदार तयारी केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काही वाहतूक बदलही करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं.
मेट्रो 7 व ‘2 अ’च्या विस्तारित मार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंदवली स्थानकात आले होते. हे स्थानक मेट्रो 1 च्या स्थानकाला लागून असल्याने सुमारे दोन तास ती सेवा बंद करण्यात आली होती. ऐन कार्यालये सुटण्याच्या वेळेस ही सेवा बंद करण्यात आल्याने सुमारे 55 हजार चाकरमान्यांचा अंधेरी व अन्य स्थानक परिसरात खोळंबा झाला.
ही सर्व कार्यालये साधारण सायंकाळी 6 ते 8 दरम्यान सुटतात. मात्र नेमक्या त्याचवेळी सेवा ठप्प केल्याने त्यांना खोळंबून राहावे लागले. तर सेवा सुरू झाल्यानंतर 7.30 ते रात्री 9.30 च्या दरम्यान खोळंबलेल्या चाकरमान्यांची गर्दीतून सुटका झाली.