जिनिव्हा – करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) करोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी पुढील आठवड्यात चीनमध्ये एक तज्ज्ञ टीम पाठविणार आहे. डब्ल्यूएचओनुसार करोना विषाणूचे मूळ शोधणे गरजेचे झाले आहे.
करोनाचे मूळ शोधल्यानंतरच या विषाणूसोबत खऱ्या अर्थाने लढता येईल. विषाणूविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विषाणूचा उदय कसा झाला, हे समजल्यानंतर पुढे योग्य दिशा मिळणार. डब्ल्यूएचओची तज्ज्ञ टीम याबाबत सविस्तर माहिती मिळवणार असल्याची खात्री डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे.
करोनावर औषध किंवा लस उपलब्ध होण्याची प्रतिक्षा करण्यापेक्षा आपण करोनापासून बचावासाठी असलेले उपाय जसे, सोशल डिस्टन्सिंग, माक्स, हात धुणे यांचा वापर करणे गरजेचे असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. करोना लवकर नष्ट होईल अशी काही शक्यता दिसत नाही, हे कडू सत्य आहे.
त्यामुळे सर्व देशांतील प्रशासनाने एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये करोनावर मात करण्यात यश आले असले तरी जागतिक स्तरावर महामारी वेगाने पसरत असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.