घाऊक बाजारात भाज्यांच्या भावात सुमारे 20 ते 40 टक्‍के घट

महागाईने मेटाकुटीला आलेल्या ग्राहकाला दिलासा

 

पुणे – भाजीपाल्याची वाढलेली आवक… त्या तुलनेत कमी असलेल्या मागणीमुळे उठाव नाही. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत घाऊक बाजारात भाज्यांच्या भावात सुमारे 20 ते 40 टक्‍के घट झाली.

परिणामी, किरकोळ बाजारात कमी भावात विक्री होऊ लागली. त्यामुळे महागाईने मेटाकुटीला आलेल्या ग्राहकाला दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती राहणार आहे. त्यानंतर मागणी वाढल्यानंतर भाव पूर्वपदाला येतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच करोनाचा परिणामही मार्केट यार्डातील आवकवर झाला. आवक कमी होत असल्याने मागील महिन्यात सर्वच भाज्यांचे भाव कडाडले होते. किरकोळ बाजारात चढ्या भावाने मालाची विक्री होत होती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर केलेल्या लागवडीचे पीक आले आहे.

परिणामी, बाजारात आवक वाढली आहे. दिवाळीमुळे गोड-तिखट फराळाकडे वळलेल्या नागरिकांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे मार्केट यार्डात किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

दरम्यान, कांदा वगळता सर्वच प्रकारच्या भाज्यांचे भाव उतरले आहेत. कांद्याच्या भावात मात्र अद्याप तेजी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पालेभाज्यांच्या भावातही घसरण झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांच्या गड्डीला घाऊक बाजारात 1 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.