पवारांचा फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर निशाणा; म्हणाले, ‘सत्ता गेल्यामुळे…’

मुंबई – मंदिर उघडण्याबाबत करण्यात आलेल्या राजकारणावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, असा सल्ला देतानाच पण ठिक आहे सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार काम करत आहे. या सरकारला सर्वसामान्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेचा हा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्‍य आलं आहे. त्या नैराश्‍यातूनच हे लोक राजकारण करत आहेत.

आपल्याला सत्ता मिळाली नाही याचा संताप आणि अस्वस्थता हे लोक या माध्यमातून व्यक्त करत आहेत, अशी टीका पवारांनी केली. सत्ता गेल्यानंतर त्रास होतो हे मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी विरोधक काही शब्द वापरत आहेत. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस यांनी राज्य सरकारला बेईमान सरकार म्हटलं होतं. त्यावर पवारांनी पलटवार केला.

त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठिक आहे त्याच्याकडे लोक बारकाईने लक्ष देतात, अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

सत्तेचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू 

आपल्या विचारांचे जे लोक नाहीत. त्यांच्या विरोधात सत्तेचा गैरवापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे. यापेक्षा वेगळं काही नाही, अशा शब्दात पवार यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य केलं.

चंद्रकांत पाटलांना चिमटा 

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत पवारांना पत्रकारांनी छेडले. त्यावर ज्यांना महाराष्ट्र जरा गंभीरपणे घेतो अशांबाबत प्रश्न विचारा. काहीही काय विचारता?, अशा शब्दात पवारांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.