पुणे – शालेय शिक्षण विभागातील विविध कार्यालयातील एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या व मक्तेदारी बनलेल्या तब्बल 230 अधिकाऱ्यांच्या एकाच दिवसात घाऊक बदल्या करण्याचा धडाका राज्य शासनाने लावला. बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी तर काहींच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या झाल्या. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था सध्या आहे. दरम्यान काही अधिकारी बदल्यांची ठिकाणे पुन्हा बदलून घेण्यासाठी मुंबई मंत्रालयाची वारी करण्याच्या तयारीत आहेत.
शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, योजना शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पंचायत समित्यांमधील शालेय पोषण आहार कक्ष आदी कार्यालयात तीन वर्षांहून अधिक वर्ष एकाच कार्यालयात एकाच टेबलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली होती. काही अधिकारी तर हुकूमशहासारखेच वावरत होते. कामे जलद गतीने मार्गी लावण्याऐवजी ती प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढले होते.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात अधिकाऱ्यांच्या फारशा बदल्याच झाल्या नव्हत्या. विद्या प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील 57, प्राचार्य 2, वरिष्ठ अधिव्याख्याता 34, शिक्षणाधिकारी 12, अधीक्षक 19, शालेय पोषण आहार कक्षाचे अधीक्षक 42, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक 64 याप्रमाणे अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काही अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढही देण्यात आलेली आहे.
दिग्गज अधिकाऱ्यांना बदल्यांचा झटका
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत यांची पुणे बोर्डात सहसचिवपदी बदली झाली. कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची पुणे महापालिकेत माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक मीना शेंडकर यांची कोल्हापूरला प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील प्रशासन अधिकारी ज्योती शिंदे यांची योजना शिक्षण संचालनालयात सहायक शिक्षण संचालक, पुणे बोर्डातील सहसचिव प्रिया शिंदे यांची रायगडला योजना शिक्षणाधिकारी, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक धनाजी बुट्टे यांची पश्चिम मुंबई येथे शिक्षण उपनिरीक्षक या पदांवर बदल्या झाल्या आहेत.