– विजय शेंडगे
विश्वास वसेकर यांची साहित्यसंपदा मोठी आहे. एकूण 60 पेक्षा अधिक साहित्यकृती. कविता, ललित, बालसाहित्य, समीक्षा असं चौफेर लेखन. एखादी ऐतिहासिक अथवा पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन त्यांनी साहित्यनिर्मिती केलेली नाही. तेवढा एक साहित्यप्रकार वगळता जवळजवळ सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं आहे. “जगण्याचा उत्सव’ ही त्यांची ललित गद्यातली जवळजवळ अकरावी साहित्यकृती.
विश्वास वसेकर हे जगण्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच जगणं सुखद करणारे आयुष्यातले सगळे पदर त्यांना उलगडून दाखवण्याची त्यातलं सौंदर्य विशद करण्याची गरज वाटते. त्यातून “जगण्याचा उत्सव’ हे ललित गद्य आकार घेतं. कधी काय टिपावं याचं वसेकरांना उत्तम भान आहे. विशिष्ट विषयाशी निगडित अनेक संदर्भ एकत्र करून त्याला त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचा स्पर्श देऊन मांडणी करणे हे वसेकरांच्या ललित लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच एखाद्या विषयावर त्यांची मतं वाचकाला कळतातच; परंतु त्याचवेळी इतर साहित्यिकांचं, विचारवंतांचं मत काय आहे हेही कळतं. विभिन्न संदर्भ एकत्र आल्यामुळे वसेकरांचं ललित सर्वस्पर्शी होतं.
माणूस जगण्याचा उत्सव कशामुळे साजरा करू शकतो? पंचेंद्रियांपैकी एखादे इंद्रिय नसेल तर माणसाला जगण्याचा उत्सव साजरा करता येईल का? निव्वळ जिव्हाच नाही अशी कल्पना करून बघा. जिव्हा नसेल तर माणसाला संवाद साधणे शक्य होणार नाही, चवींचा उत्सव साजरा करता येणार नाही. स्पर्शाच्या अनुभूतीसाठी बोटांपेक्षा जिव्हा अधिक श्रेष्ठ. त्या संदर्भातला द. भी. कुलकर्णी आणि कीम यांच्यातल्या संवादाचा संदर्भ पुरेसा बोलका आहे.
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या अनुभूती. शरद, हेमंत, शिशिर हे ऋतू. श्यामा, मैत्रीण, मेहुणी ही आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांची विभिन्न रूपं. आयुष्यातली विभिन्न नाती. या सगळ्यांच्या आयुष्यातून साजरा होतो तो जगण्याचा उत्सव. वसेकर या नानाविध विषयांचं वर्णन अत्यंत सौंदर्यपूर्ण, रसाळ, ओघवत्या, हलक्याफुलक्या भाषेत करतात. अधेमधे विनोदाचा तडका दिलेला असतो. त्यामुळेच त्यांचे लेखन निव्वळ वाचनीय ठरत नाही तर खुमासदार होतं.
पौराणिक, ऐतिहासिक, साहित्यिक, काव्यमय, भारतीय साहित्यातले, विदेशी साहित्यातले त्या त्या विषयाशी संबंधित अनेक संदर्भ त्यांच्या लेखनात असतात. त्यामुळेच त्यांचं त्यांच्या साहित्याचं वाचन वाचकाला समृद्ध आणि बहुश्रुत करतं. जगण्याचा उत्सव कसा साजरा करावा हे सांगता सांगता हे पुस्तक डेथ फेस्टिव्हल पर्यंत आणि मृत्यूही देखील साजरा करण्याची गोष्ट आहे, असं सांगून जातं. रवी मुकुलांचं समर्पक मुखपृष्ठ, शिरीष घाटेंची मार्मिक रेखाचित्रे ही या पुस्तकाची आणखी काही वैशिष्ट्ये.
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
पाने : 152, मूल्य : 210 रुपये