महापौरपदाची “लॉटरी’ कोणाला?

पिंपरी – महापौरपदाची आरक्षण सोडत नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवडचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहण्याची दाट शक्‍यता आहे. या आरक्षित जागेवर निवडून आलेल्या भाजपच्या कोणत्या नगरसेवकाला महापौरपदाची “लॉटरी’ लागणार याबाबत कुतूहल आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील 26 महापालिकांचा महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य सरकारसह नव्या मंत्रिमंडळाची स्थापना 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महापौरपदांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्‍चित होईल. राज्याच्या नगरविकास विभागाने महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण केली आहे. आता फक्त तारीख निश्‍चित होणे बाकी आहे.

शहराच्या महापौरपदासाठी आतापर्यंत इतर मागासवर्ग (ओबीसी), खुला महिला प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) महिला असे आरक्षण यापूर्वी पडले आहे. आता सर्वसाधारण की अनुसूचित जातीसाठी (एससी) महापालिकेचे महापौरपद आरक्षित होईल, याबाबत उत्सुकता आहे.

21 नोव्हेंबरपूर्वी होणार महापौर निवड
पिंपरी-चिंचवडचे विद्यमान महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल 14 सप्टेंबर रोजी संपुष्टात आला आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिने म्हणजे 21 नोव्हेंबरपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन महापौर निवडीकामी उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, माघारीची मुदत ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरपूर्वी महापौर निवडणूक घ्यावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.