निर्मला आवारे यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट
भोर – भोर नगरपालिकेच्या कारभाराबाबत नगराध्यक्षा निर्मला आवारे आणि नगरसेवक यांच्यात मतभेदाचे राजकारण सुरू आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. 13) नगराध्यक्षा निर्मला आवारे यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जावून भेट घेतल्याने भोर नगरपालिकेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले असून आवारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का, अशी उलटसुलट चर्चा भोर शहरात रंगत आहे. या भेटीमुळे भोर नगरपालिकेच्या राजकारणात उलथापालाथ होणार का? याकडे भोर शहर वासियांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षा निर्मला आवारे व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी खासदार सुप्रीया सुळे यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देवून स्वागत केले. दरम्यान, आवारे, सुळे यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आवारे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले. तर खासदार भोरमध्ये आल्या असताना त्यांना मी चहापानासाठी निमंत्रीत केले असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले.
यावेळी खासदार सुळे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, मा. नगरसेवक यशवंत डाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, सारंग शेटे, राष्ट्रवादीच्या भोर शहराध्यक्षा हसीना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याची पुनरावृत्ती
भोर नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे काही नव्याने घडत नसून अनेकदा नगराध्यक्षांच्या विरोधात वाद झालेले सर्वश्रुत आहे. नुसते वादच नव्हे तर हे वाद न्यायालयापर्यंत दाखल होवून नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. याची पुन्हा पुनरावृत्ती होण्याची चिन्हे असल्याचे चित्र समोर येत आहे. याचा भोर शहराच्या विकास कामांवर विपरीत परीणाम होणार तर नाही ना? या अशी खमंग चर्चा रंगली आहे.