मुंबई – मुंबईतील नेपियन सी मार्गावरील तब्बल 22 मजली अलिशान वास्तू रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यांचे मित्र आणि सुमारे चार दशकांचे मित्र मनोज मोदी यांना भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे मनोज मोदी कोण, अशी चर्चा सगळीकडे सूरू झालेली आहे. मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. मोदी यांनी अंबानींच्या तीन पिढ्यांसोबत काम केले आहे.
मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी कंपनीचे प्रमुख असताना मनोज मोदी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला रिलायन्समध्ये आले. मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे मागील पाच दशकांपासूनचे मित्र आहेत. मनोज मोदी आता मुकेश अंबानी यांची मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासोबतही काम करत आहेत. मनोज मोदी यांनी मुकेश अंबानींच्या हजिरा पेट्रोकेमिकल, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस आणि रिलायन्स रिटेलसारखे मोठे प्रकल्प हाताळण्यासोबत त्यांनी जामनगर रिफायनरीत काम करताना कंत्राटदार आणि व्यापारी यांच्यात मोठे व्यवहार केले होते.
रिलायन्स जिओ ही कंपनीदेखील मनोज मोदी यांच्या मेंदूतून साकारली गेली असल्याचे सांगितले जाते. सध्या ते रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. आजही व्यवसायातील मोठे निर्णय घेण्यासाठी मुकेश अंबानी मनोज मोदींवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. त्यांच्याविषयी अंबानी कुटुंबात खूप आदर असल्याचे निकटवर्तीय सांगतात.
मनोज मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या घराची किंमत तब्बल 1500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाहीत. रिलायन्स उद्योगसमूहातील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांची नेहमीच प्रमुख भूमिका असते. असे असले तरी पडद्याआड राहून शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. ते 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडले गेले आणि तेव्हापासून ते कंपनीसोबत आहेत.
रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये संचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे मोदी अलिशान घर भेट मिळाल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. या घराचे नाव ‘वृंदावन’ असे आहे. 22 मजल्यांची ही इमारतीचे बांधकाम एक लाख 70 हजार चौरस फूट एवढे आहे. रिअल इस्टेटमध्ये खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांना सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या मते, या इमारतीची किंमत सुमारे 1 हजार 500 कोटींच्या घरात आहे. घरातील काही फर्निचर इटलीमधून आयात करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.