नवी दिल्ली – विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अशक्यप्राय काम शक्य होत आहे. यामुळेच लोक चंद्रावर पोहोचले असून समुद्रात बोगदे बनवले जात आहेत. या दिशेने एक अनोखा बोगदा तयार करण्यात आला आहे, जो जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नॉर्वेतील हा बोगदा पादचारी आणि सायकलस्वारांसाठी बनवण्यात आला आहे.
* डोंगर कापून बोगदा तयार केला
नॉर्वेच्या दुसर्या क्रमांकाच्या बर्गन या शहरामध्ये बांधण्यात आलेल्या अनोख्या बोगद्याची लांबी सुमारे तीन किमी आहे, ज्याला “फिलिंग्सडलस्टोनलेन टनेल”(Filingsdalstonlen Tunnel) असे नाव देण्यात आले आहे.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा बोगदा लोवास्ताकन पर्वत कापून बनवण्यात आला आहे. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा बोगदा फिलिंग्सडलेन आणि मिंडेमिरेनच्या निवासी भागांना जोडतो. सायकलिंगसाठी बनवलेल्या या अनोख्या बोगद्याबद्दलच्या मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.
* चार वर्षात पूर्ण
2019 साली फिलिंग्सडलस्टोनलेन बोगद्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, जे चार वर्षांत पूर्ण झाले. हा अनोखा बोगदा बनवण्यासाठी 238 कोटी रुपये खर्च आला आहे. सायकलने बोगदा पार करण्यासाठी 10 मिनिटे आणि पायी चालत 40 मिनिटे लागतील.
* पर्यावरण प्रदूषणाचा सामना करण्यासाठी बोगदा
चालणे आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा बोगदा बांधण्यात आला आहे. यासोबतच पर्यटकांना नवा अनुभव देण्याचाही उद्देश आहे. हा बोगदा सकाळी 5.30 ते रात्री 11.30 या वेळेत लोकांसाठी खुला असेल. बोगद्याचे तापमान सात अंश सेल्सिअस ठेवण्यात येणार आहे जेणेकरून लोकांना थंडीच्या वातावरणात सायकल चालवताना कोणतीही अडचण येऊ नये.
* बोगद्याची वैशिष्ट्ये
नॉर्वेमध्ये बनवलेल्या अनोख्या बोगद्याच्या आतही सजावट करण्यात आली आहे. लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले आहेत. बोगद्याच्या मध्यभागी सन डायल नावाची आकर्षक इन्स्टोलेशन तयार करण्यात आले आहे. बोगद्याच्या आत पादचाऱ्यांसाठी 2.5 मीटर रुंद लेन, तर सायकलस्वारांसाठी 3.5 मीटर रुंद लेन बनवण्यात आली आहे.