मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचे सरकार नोवाक जोकोवीचबाबत जे काही वागले ते काय होते. कोणता हेतू होता. जोकोवीच एक टेनिसपटू आहे त्याला एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक का दिली गेली, असे असंख्य प्रश्न विचारत टेनिस विश्वातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू जोकोवीचच्या व्हिसा कागदपत्रात काही चुका होत्या तर त्याला त्या दुरुस्त करण्याची संधी का नाकारली गेली. एकीकडे त्याला करोना लसीकरणात सवलतही दिली गेली व लगेचच अवैध पद्धतीने ऑस्ट्रेलियात घुसखोरी केलेल्यांच्या छावणीतही पाठवले गेले. या मागे नेमका कोणता हेतू होता. जोकोवीच गुन्हेगार नाही, तरीही ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्याच्याबाबत हे वर्तन का केले, असे सवाल जागतिक टेनिस महासंघाने केला आहे.
जोकोवीचने सरकारच्या निर्णयावर याचिका दाखल केली होती ती देखील फेटाळली गेली. इतकेच नव्हे तर त्याला सर्बियाला परत पाठवले गेले. एका जगविख्यात खेळाडूच्या बाबतीत हे का घडले किंवा कोणी जाणूनबुजून घडवले याचे उत्तर कधी मिळणार? ऑस्ट्रेलिया सरकारच्या व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात जोकोवीचने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, केंद्रीय न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियातून सर्बियाला परत पाठवले गेले.
केंद्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे येथे सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेतून त्याला बाहेर पडावे लागले. तसेच तब्बल नऊ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोवीचला यंदा 21 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांचा विक्रमही आपल्या नावे करण्याची संधी गमवावी लागली.