मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसांत हजर
सोलापूर, दि. 17 – बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे हा सोमवारी पोलीस स्थानकात हजर झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात विशाल फटे स्वतःहून हजर झाला आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी विशाल फटे हा मुख्य आरोपी आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या माध्यामातून वर्षात दामदुपटीचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना कोटयवधी रुपयांची फसवणूक करून विशाल फटे हा फरार होता. सध्या त्याच्या विरोधात पाच कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशाल फटे, त्याचे वडील अंबादास, आई, भाऊ वैभव आणि पत्नी यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांनी विशाल फटे व त्याच्या वित्तीय संस्थांशी निगडीत पाच बॅंक खाती गोठवली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.