नवी दिल्ली – भारत आता चंद्रावर पोहोचण्यापासून फक्त काही पावले दूर आहे. चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डी-बूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी येत्या बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरण्यापूर्वी महत्त्वाच्या टप्प्याचे बारकाईने निरीक्षण केले.
लॅंडर विक्रमने स्वतःला अखेरच्या कक्षेत स्थापित केले आहे. या कक्षेतून चंद्राचे सर्वात जवळचे अंतर 25 किमी आहे आणि सर्वात दूरचे अंतर 134 किमी आहे. या कक्षेतूनच बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सॉफ्ट लँडिंगकडे लागले असून, इस्रोकडून एक नवीन इतिहास रचला जाणार आहे.
दरम्यान, ही ऐतिहासिक घटना घडत असेल, तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे असतील? असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. ‘चांद्रयान 2’ (6 सप्टेंबर 2019 रोजी) मिशनच्यावेळी ऐतिहासिक क्षणाच साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधान मोदी इस्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयात उपस्थित होते.
मात्र, यंदा ‘चांद्रयान 3’ मिशनमध्ये इस्रो ज्या दिवशी इतिहास रचणार, त्या दिवशी पंतप्रधान मोदी भारतात नसतील. पीएम मोदी 22 ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होतील. पीएम मोदी मंगळवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. पीएम संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पोहोचतील.
तिथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधानांना बुधवारी दुपारी दोन वाजता परराष्ट्र सचिवांकडून ब्रिफिंग दिली जाईल. पीएम 24 ऑगस्टपर्यंत दक्षिण आफ्रिकेत असतील. त्यानंतर ते मिस्त्रसाठी रवाना होतील. असा पंतप्रधान मोदींचा दौरा असणार आहे.