विक्रेत्यांवरच आर्थिक संकट : लॉकडाऊनमुळे अपेक्षित विक्री नाही
पिंपरी – लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. संसाराला उभारी देण्यासाठी अनेकांनी कर्ज काढून गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकजण गावी गेले. तसेच अनेकांनी यंदा गणेशोत्सवाला बगल दिली. यामुळे अपेक्षित विक्री न झाल्याने गणेश मूर्ती विक्रेत्यांवर पुन्हा आर्थिक संकट आले आहे. तसेच काही विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. आता या मूर्ती वर्षभर ठेवायच्या कुठे? असा प्रश्न देखील विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे.
दरवर्षी रंग, माती आणि कारागीराच्या मानधनात वाढ होत असल्याने गणेश मूर्तीच्या किंमतीतही वाढ होते. यंदाही ती वाढ झाली. करोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाल्याने गणेश मूर्तीची विक्री करीत आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी अनेकांनी शहराच्या विविध भागात गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल टाकले. कारखान्यातून या मूर्ती खरेदीसाठी कर्जही काढले. आता या व्यवसायात दुप्पट फायदा होण्याचे गणित त्यामागे होते. मात्र झाले उलटेच.
कारखान्यातून गणेश मूर्ती आणण्याचा खर्च, प्रवासात काही मूर्ती भंग पावल्या. आठ दिवसाचे मंडपाचे भाडे 10 ते 12 हजार रुपये दिले. महापालिकेनेही आपले दोन-अडीच हजार भूईभाडे घेतले. यंदाच्यावर्षी गणेश मूर्तींची अपेक्षित विक्री झाली नाही. यामुळे शिल्लक राहिलेल्या गणेश मूर्ती वर्षभर ठेवायच्या कुठे, गुंतवलेल्या पैशांची परतफेड करायची कशी, असे प्रश्न आता गणेश विक्रेत्याच्या समोर उभे राहिले आहेत.
लॉकडाऊन आणि करोनाच्या भितीने अनेक कुटूंब अद्याप गावीच आहेत. यामुळे त्यांनी गणेशोत्सवही गावीच साजरा केला. तर अनेक छोट्या-मोठ्या मंडळांनीही यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. काही जणांनी शासनाच्या नियमांपेक्षा मोठ्या मूर्ती असल्याचे सांगत बुकींग करूनही त्या मूर्ती नेल्या नाहीत. याचाच फटका गणेश मूर्ती विक्रेत्यांना बसला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी मिळेल त्या भावाला मूर्ती विकल्या. तरीही अजूनही मूर्ती शिल्लक आहेत. या मूर्ती आता ठेवायच्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज काढून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्ती विक्रीसाठी आणल्या. मात्र जेमतेम फक्त गुंतवणूक केलेली रक्कम मिळाली आहे. आता शिल्लक राहिलेल्या मूर्त्यांचे काय करायचे आणि वर्षभराचे आर्थिक नियोजन कसे करायचे, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
– विजय शिंदे, गणेश मूर्ती विक्रेता-पिंपरीगाव