पुणे – मेट्रोची सेवा पिंपरी-चिंचवड आणि कोथरूडपासून (वनाज) रुबी हॉलपर्यंत सुरू झाल्याने पुणेकरांना शहरातील प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, अनेक स्थानकांच्या परिसरात पार्किंगसाठी जागाच नसल्याने प्रवाशांना जागा शोधण्यातच वेळ घालवावा लागत आहे.
ज्या मार्गावर मेट्रो धावते, ते वर्दळीचे आहेत. शिवाय, अनेक भागांत नो पार्किंग असल्याने पोलिसांनी वाहन उचलून नेल्यास अडचणी निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा निश्चित आहेत, तेथे मेट्रोच्या कामांचे साहित्य ठेवण्यात आले आहे. ही स्थिती पाहता, मेट्रो प्रवासामुळे वाचणारा वेळ पार्किंगची जागा शोधण्यात अथवा मेट्रो स्थानकापर्यंत पोहचण्यातच जात आहे.
मेट्रो स्थानकांच्या परिसरात पालिकेची वाहनतळे मेट्रोला जोडली जाणार आहेत. मात्र, अनेक भागांत वाहनतळांसाठी जागांवर मेट्रोचे साहित्य पडलेले आहे. परिणामी, मेट्रोसाठीची वाहनतळे सुरू झालेली नाहीत. पुणेकरांना मेट्रो वापरायची असली, तरी घरापासून मेट्रो स्थानकावर येण्यासाठी स्वत:चे वाहन आणावे लागते. नंतर ते पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागते. वाहन रस्त्यावरच सोडावे लागत असल्याने ते चोरी होण्यासह पोलिसांनी उचलून नेण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना रिक्षाद्वारेच स्थानके गाठावी लागत आहेत.
स्थानकांच्या दारातच वाहने
मेट्रो प्रवासासाठी आलेल्यांना पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने स्टेशनच्या प्रवेशद्वारातच वाहने उभी केली जात आहेत. प्रामुख्याने एसएनडीटी, गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, आरटीओ कार्यालय, शिवाजीनगर, रुबी हॉल स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच पार्किंग होत आहे. त्यामुळे नागरिकांना जवळच्या गल्लीबोळांत जागा शोधावी लागत आहे. हे लक्षात घेता, महामेट्रो आणि पालिकेने पार्किंगसाठी जागा देण्याची मागणी केली जात आहे.
“दोन दिवसांपूर्वी मेट्रोने प्रवास केला. पार्किंगला जागा नसल्याने वनाज स्थानकाच्या परिसरात मी वाहन लावले. मात्र, ती जागा नो पार्किंगची असल्याने पोलिसांनी वाहन उचलले. मला 500 रुपयांचा दंड बसला. शिवाय वेळ गेला तो वेगळाच. रिक्षा करून यायचे, तर रिक्षाचालक मीटरऐवजी 50 रुपये मागतात.” – एक प्रवासी (रा. महात्मा सोसायटी)