– माधव विद्वांस
कथ्थक नृत्यसम्राट, अभिनेते, कथ्थकच्या बनारस घराणा शैलीचे नर्तक आणि नृत्यगुरू व नृत्यदिग्दर्शक पद्मश्री गोपी कृष्ण यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म आजोळी कोलकाता येथे 22 ऑगस्ट 1935 रोजी झाला. मात्र, त्यांचे बालपण व शालेय शिक्षण मुंबईत पार पडले. त्यानंतर ते पुन्हा आजोळी कोलकाता येथे पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांचे आजोबा सुखदेव महाराज नेपाळमध्ये दरबारी नर्तक व गायक होते. सुखदेव महाराज गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या संपर्कात आले व ते शांतिनिकेतन येथे आले. कालांतराने त्यांनी कथ्थक नृत्यवर्ग सुरू केले. त्यांच्या तीनही मुली कथ्थक नृत्यांगना होत्या. त्यामुळे गोपी कृष्ण यांना नृत्याचे उत्तम शिक्षण मिळाले.
आपले आजोबांबरोबरच त्यांनी नृत्यगुरू शंभू महाराजांकडूनही धडे घेतले. तसेच कथ्थक व्यतिरिक्त, गोपी कृष्ण यांनी महालिंगम पिल्लई आणि गोविंद राज पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम शिकले. त्यांनी आपल्या नृत्यात भरतनाट्यम् आणि कथ्थकलीमधील अनेक घटक समाविष्ट केले. त्यामुळे ते भारतीय नृत्यकलेत सर्वांगी निपुण झाले. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ऑल बंगाल म्युझिक कॉन्फरन्समध्ये नटराज (नर्तकांचा राजा) ही पदवी प्राप्त केली. त्यांनी 9 तास 20 मिनिटे सतत कथ्थक नृत्य करून विश्वविक्रम केला. त्यांनी पूर्व आफ्रिका तसेच काही पाश्चात्य देशांमध्ये परदेशातही अनेक कार्यक्रम करून भारतीय नृत्यकलेची ओळख जगाला करून दिली. त्यांनी तबला, चंदा (चेंडा एक दक्षिण भारतातील ताशा प्रकारचे वाद्य) आणि पखवाज या तीन तालवाद्यांवरही नृत्य करून आपली नृत्यनिपुणता सिद्ध केली.
वर्ष 1952 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी “साकी’ या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी मधुबाला हिला त्यांनी नृत्याचे मार्गदर्शन केले व हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात तरुण नृत्यदिग्दर्शक बनले. वर्ष 1955 मध्ये त्यांनी व्ही. शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात अभिनय व नृत्यदिग्दर्शन केले. या चित्रपटात त्यांनी “गिरधर’ या प्रतिभावान तरुण नर्तकाची भूमिका केली होती. “नैन सो नैन नहीं मिलाओ’ या गाण्यामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. तसेच शास्त्रीय नृत्याची लोकांमध्ये आवड निर्माण होण्यास मदत झाली. या चित्रपटामुळे त्यांना चंदेरी दुनियेत प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मेहबूबा, दास्तान, उमराव जान, मुघल-ए-आझम, आम्रपाली आणि द परफेक्ट मर्डर यांसारख्या सुमारे 70 चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
तसेच त्यांनी मधुबाला, वैजंतीमाला, मुमताज, संध्या, आशा पारेख या अभिनेत्रींना नृत्यकलेचे प्रशिक्षण दिले होते. गोपींचा विवाह वर्ष 1964 मध्ये कथ्थक नृत्यांगना सावित्री यांच्याबरोबर झाला. त्यांची कन्या शंपा नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक बनली. ती “झलक दिखला जा’ या डान्स शोच्या 5 व्या आणि 7 व्या सत्राच्या सीझनची विजेती म्हणून उदयास आली. व्यवसायाबरोबर त्यांचे राष्ट्रसेवेकडेही लक्ष होते. त्यांनी भारताच्या सीमा चौक्यांना भेट दिली आणि अभिनेता सुनील दत्त यांच्या अजंता कला मंडळासह सैनिकांचे मनोरंजन केले. नंतर गोपींनी नृत्यासाठी नटेश्वर भवन अकादमी आणि नटेश्वर नृत्य मंदिराची स्थापना केली. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले तसेच प्रयाग संघर्ष समिती, अलाहाबादमध्ये नृत्यसम्राट, हैद्राबादच्या स्थानिक कला संघटनेच्या माध्यमातून कलापर्णाने गौरविण्यात आले. 1975 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. 18 फेब्रुवारी 1994 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.