जनता पक्षाची दहा कलमी योजना
नवी दिल्ली, 21 – किमती स्थिर राखण्यासाठी जनता पक्षाने दहा कलमी योजना आणली आहे. त्यानुसार सार्वजनिक वाटप व्यवस्थेत सुधारणा करावी, असे आवाहन जनता पक्षाच्या कार्यकारिणीने केंद्र व राज्य सरकारांना केले आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार सरकारला असणाऱ्या अधिकारांची जेथे व जेव्हा जरुरी असेल तेथे व तेव्हा दिरंगाई न करता साठेबाज, नफेबाज, काळाबाजारवाले व इतर समाजद्रोही घटकांविरुद्ध वापर करावा. किमती व दर्जा यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वायत्त मंडळ नेमण्यात यावे, असेही सुचविण्यात आले.
व्हिकी मोपेडची मिनी मोटार
पुणे – व्हिकी मोपेड हे दुचाकी आणि दोन माणसे वाहून नेणारे वाहन भारतात कमालीचे लोकप्रिय आहे. पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने व्हिकी मोपेडची निर्मिती होते. याच कंपनीने व्हिकी 2 ही मिनी मोटारसायकल तयार केली असून नुकतीच पुण्याच्या बाजारात आली आहे. 70 किलो वजनी मिनी मोटारसायकल दिसायला देखणी आहे. इंजिन व्हिक्टोरिया सिंगल सिलिंडर, 2 स्टोक 50 सीसी आहे. अर्ध्या कीकमध्ये मोटारसायकल सुरू होते. पेट्रोल टॅंक मोठा असून त्यात 10 लिटर पेट्रोल मावते. शिवाय रिझर्व कॉकची व्यवस्था आहे, तर 60 प्रतिकिमी वेग आहे.