देवही न जाणे कुठून असं नातं जुळवतो?

अनोळखी व्यक्तींनाही हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी आपण ओळखतही नसतो, त्यांना अगदी जीवाचे जिवलग बनवतो. मैत्री हे असे ऋणानुबंध असतात फक्त एकमेकांना भेटण्याचा अवकाश असतो. वयाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला मित्र-मैत्रिणी भेटत असतात. त्यामुळे मैत्रीसाठी खोटे बोलणे, मदत करणे, भांडणे पुन्हा एकत्र येणे ह्या गोष्टी सुरू असतात. याशिवाय मैत्रीचा अर्थ ही उलगडत नाही.

समान विचारांचे बरेचदा एकत्र येत असतात. कधी मैत्रीसाठी ओरडा खावा लागतो, कधी मैत्रीसाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवली जाते. ही जीवनातील मैत्री काय देते आपल्याला तर मैत्री देते आपल्या आयुष्याला आकार, सुखदुःखाला सामोरे जाण्याची सकारात्मक ऊर्जा, मैत्री असते आधार कधी बरोबर नसूनही असण्याची शक्ती, मैत्री असते मनातील असा कप्पा की जिथे मारता येतात हव्या तेव्हा गप्पा! मैत्रीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत पण मला वाटते; मैत्री असे फुल जे कधीही कोमेजत नाही, असं चंदन की ते जे जसे उघडू तसा त्याचा सुगंध अधिक दरवळत जातो.

वचनासाठी विश्‍वासासाठी जपली जाणारी मैत्री असते. प्रत्येकाला मैत्रीसाठी परीक्षा द्यावी लागली असेल, असे प्रसंग आलेच असतील. त्या प्रसंगातूनच मैत्री बहरते, फुलते आणि जीवन जगायला आपल्याला प्रोत्साहन देते. मैत्री आपलेपणाने सजवायची, मैत्री भांडणाने गाजवायची आणि पुन्हा प्रेमाने रुजवायची मगच तिची सुंदर फुले उमलतील, त्याचा सुगंध दरवळेल आणि आयुष्यभर आपल्याला सोबत करेल. आपली ही मैत्री अशीच असते कधी हवीहवीशी तर कधी नकोशी.

बरेचदा भांडणे होतात, गैरसमज होतात पण आपल्याला जे जाणतात ते कधीच अढी ठेवत नाही. मैत्रीला लगेच माफही करतात. प्रत्येकालाच चांगले मित्र-मैत्रिणी भेटतातच असे नाही पण जे आहेत ते नक्कीच जपले पाहिजेत. नुकताच 4 ऑगस्ट रोजी हा मैत्रीचा खास दिवस साजरा झाला. त्यासाठी हा लेख प्रपंच. आपण सर्व एकत्र आहोत आणि नेहमीच एकत्र राहणार कोणत्याही वचनाशिवाय. लिहिण्यासाठी शब्द-काव्य ही कमीच पडेल अशी आपली मैत्री ही अशीच उत्तरोत्तर उत्तर वाढत जावो ही मनापासून प्रार्थना.

बंध हे रेशमाचे नाते
आपुलकीने जपायचे
नाते आपल्या मैत्रीचे
असेच जपून ठेवायचे…

– दीपाली जंगम

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)