सन्मान पत्रकारितेचा…

ना हम भीड बन रहे थे,
ना हम भीड बना रहे थे,
हम तो अपना
पत्रकारिता धर्म निभा रहे थे
असे म्हणत विवेकाचा आवाज बुलंद करीत, चांगुलपणावरचा आपला विश्‍वास वाढवीत, मूल्याधिष्ठीत पत्रकारिता जपणारा पत्रकार म्हणजे रवीशकुमार.

रवीशकुमार यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यावर समाज माध्यमांमध्ये देशभरातून अपेक्षित-अनपेक्षित प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रॅमन मॅगेसेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल म्हणूनही ओळखला जातो.

समकालीन स्थितीमध्ये किंवा एकंदरीतच पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण व्हावेत अशी स्थिती कायम राहिलेली आहे. पुरस्कार प्राप्ती हा दर्जाचा निकष बनणे हाच दर्जावर होणारा सर्वात मोठा आघात आहे. मात्र, पुरस्काराकडे आपल्या कर्तृत्वाच्या प्रवासात मिळालेली एक पोचपावती म्हणून पाहणारी माणसे खूप कमी आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे रवीशकुमार.

त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात 1996 साली एनडीटीव्हीमधून केली. वाचकांची आलेली पत्रे पाहण्याच्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे रवीशकुमार आज त्याच माध्यम समूहामध्ये कार्यकारी संपादक या महत्वपूर्ण पदावर कार्य करीत आहेत. बिहारमधील जितवापूर या छोट्याशा गावात साधारण कुटुंबात जन्मलेला एक मुलगा संघर्ष करीत, प्रचंड मेहनत घेत आज भारतातील एक उत्कृष्ट पत्रकार ही ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

रवीश की रिपोर्ट, प्राईम टाईम या आपल्या शोमधून त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा रामनाथ गोयंका पुरस्कारही त्यांना याआधी मिळाला आहे. आपली निर्भीड पत्रकारिता करीत असताना अनेकवेळा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्‍याही आलेल्या आहेत. ट्रोल करून त्यांना शिव्यांची लाखोली वाहणारे वेगळेच! सातत्यपूर्ण बोलत, लिहीत, व्यवस्थेच्या पटलावर नसलेल्या विषयांना प्राधान्यक्रम देत, लोकांचे जगणे मांडत, बोलायचे कोणी या प्रश्‍नाचे उत्तर रवीश कुमार हा पत्रकार देतो.

लोकशाहीचा चौथा स्तंभ कुठे आहे, हे शोधावे लागण्याची सध्याची वेळ, त्यात पुन्हा रवीशकुमार यांना या संक्रमण अवस्थेत मिळालेला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार यामुळे असख्यांना मी कुठे लपू हा प्रश्‍न पडला आहे. कारण आपण कोणाच्या यशाचे कौतुक करू शकू इतके मोठे थोडेच झालो आहोत! आपली उंची खूप खुजी आहे, जी वाढविण्यास पुरस्कार नाही तर काम तसं असणे आवश्‍यक आहे.

व्यवस्थेला नि:पक्षपणे प्रश्‍न विचारत सत्य समोर ठेवणे हे पत्रकारांचे काम आहे. पूर्वग्रहदूषित मते लोकांवर न लादता त्यांना विचार करून योग्य अयोग्य ठरवू दिले पाहिजे. काहीही झाले तरी मी माझी पत्रकारिता जपेल असे म्हणत रवीशकुमार यांनी आपला पत्रकारिता धर्म तत्वांशी कधीही आणि कसलीही तडजोड न करता जपला आहे. खूप कमी जणांना हे माहिती आहे की, रवीश हे 2014 च्या आधीही आज इतकीच निर्भीड, नि:संदेह, नि:पक्षपाती, स्पष्ट, पारदर्शी आणि वास्तव सत्य लोकांपर्यंत पोहचविण्याची भूमिका निभावित होते.

बहुत बुझाने की कोशिश की गई, मगर ये दिया जगमगाता रहा म्हणत दर्जात्मक पत्रकारितेची ज्योत तेवत ठेवत पत्रकारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या रवीशकुमार यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

– श्रीकांत येरूळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)