लोणी काळभोर,(वार्ताहर) -दारू पिण्यासाठी मित्रांमध्ये पैसे गोळा करताना मित्रांनी चेष्टा मस्करी केली, वादावादी झाली म्हणून लोखंडी रॉडने मित्रांना मारणार्याला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कात्रज बायपास रस्ता, कात्रज येथे 24 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 9 वाजता ही घटना घडली होती. अमोल राजाराम ढवळे (वय 33, रा. श्रीपाद हौसिंग सोसायटी, विद्यानगर, धनकवडी; मूळ रा. आडूळ, ता. पाटण, सातारा), बालाजी गणपतराव कदम (वय 40, रा. संतोषनगर, कात्रज), रजनीकांत ऊर्फ बापु चंद्रकांत मारणे (वय 29, रा. रायकर मळा, धायरी), बाळु हनुमंत पुजारी (वय 34 रा. संतोषनगर, कात्रज) व आरोपी दीपक महादेव टोमके (वय 34, रा. संतोषनगर, कात्रज) असे सर्वजण दारु पिण्यासाठी पैसे गोळा करीत होते.
यावेळी आरोपी दीपक टोमके याचेबरोबर चेष्टा मस्करी, वादावादी झाली. ही चेष्टा मस्करी दीपक टोमके यास सहन झाली नाही. त्याने त्याच्या दुकानातून लोखंडी पाइप आणून फिर्यादीच्या डोक्यात डावे बाजूस जोरात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी बाळु हनुमंत पुजारी हे मध्ये आले असता, त्यांनाही पाइपने मारुन गंभीर जखमी करून त्यांचा डावा डोळा निकामी केला होता.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक निरीक्षक एस. पी. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक रमेश चौधरी यांनी तर अंमलदार म्हणून एस. पी. शिंदे, व्ही. एस. मदने यांनी काम पाहिले.