केडगाव (वार्ताहर) -आगामी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शाळा नेमक्या केव्हा सुरू होणार? याबाबत शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. मे महिन्याचा अंतिम आठवडा सध्या सुरू झाला असून जून महिन्यात प्रत्येक वर्षी शाळा सुरू होतात. त्यामुळे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची केडगाव बाजारपेठेत झुंबड सुरू होते; परंतु सध्या करोना विषाणूच्या भयानक प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक वर्षाची वार्षिक परीक्षा होऊ शकली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरीनुसार गुणदान देऊन वरच्या वर्गात पाठवण्यात आले. अजूनही महामारीची भयानकता वाढतच आहे. दररोज येणारी आकडेवारी भीती निर्माण करणारी आहे. मोबाईलच्या माध्यमातून काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणव्यवस्था सुरू केली असली तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. सर्वच पालक व मुलांकडे अण्ड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळे अभ्यास कसा करावा? असा प्रश्न आहे.
शिवाय शाळेतील मौजमस्ती, मित्रांशी गप्पा याचा अनुभव केवळ शाळेतच मिळू शकतो, अशी धारणा विद्यार्थ्यांची बनली आहे. त्यामुळे मोबाईल, दूरदर्शन इत्यादीवरून देण्यात येणाऱ्या शिक्षणाला मर्यादा निर्माण होत आहेत. यासाठी शाळेची घंटा घणघणने आवश्यक वाटत आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने विविध उपाय योजना अवलंबून सालाबादप्रमाणे जून महिन्यातच शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असल्या तरी सध्याची करोनाची स्थिती पाहता ते शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शाळेची घंटा वाजून चिमुकल्या मुलांचा किलबिलाट नेमका केव्हा सुरू होणार? याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.