पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये नवीन नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. ज्येष्ठ नगरसेवक बोलत असताना सतत ज्यूनिअर व सिनिअर असे बोलत असतात त्यामुळे नवीन नगरसेवकांना शरमल्यासारखे होते. हा नवीन जुना भेद तुम्ही कधी संपवणार आहात? असा प्रश्न नगरसेवक अभिषेक बारणे यांनी उपस्थित केला.
सभागृहामध्ये बोलत असताना सतत नवीन नगरसेवकांकडे एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. आम्हालाही आता साडेतीन वर्ष झाले आहेत. आम्हालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत. मात्र सततच सभागृहामध्ये नवीन-जुना असा भेद केला जातो. हे ज्येष्ठ आणि नवीन काय आहे. आम्हीही जनतेमधून निवडून आलो आहे. आम्हाला मते मांडण्याचा अधिकार आहे. नेहमीच नवीन नगरसेवकांना ज्येष्ठ नगरसेवक नवखे म्हणत असतात. त्यामुळे सभागृहात अवघडल्यासारखे होत असल्याचे नगरसेवक बारणे यांनी सांगितले. तर बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले, हे सतत नवीन नवीन काय आहे. आता साडेतीन वर्ष झाले. अजून किती दिवस असे चालणार?
माझा नातेवाईक ठेकेदार
डॉक्टर भरतीच्या विषयावरून आरोप करताना योगेश बहल यांचे भाषण घसरले आणि थेट माझा नातेवाईकच महापालिकेत ठेकेदार असल्याचे कबूल केले. माझ्या साडुचे विषय घेऊन मी आयुक्तांकडे गेलो असतो तर व्हेंटिलेटरचा विषय आयुक्तांनी मला मार्गी लावून दिला असता. मात्र मी आयुक्तांकडे माझ्या नातेवाइकाची शिफारस घेऊन गेलो नाही. बोलण्याच्या ओघात आयुक्तांनी बेकायदेशीर काम मार्गी लावले असती अशी कबुली देतानाच माझा नातेवाईक महापालिकेत ठेकेदारी करत असल्याचेही त्यांनी कबुल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगरसेवकाच्या नातेवाइकाला कायद्यानुसार महापालिकेत काम करता येत नसतानाही बहल यांचा नातेवाईक काम करत असल्याचे समोर आले आहे.