पुणे- पुणे, नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर गेल्या दोन आर्थिक वर्षात साडेपाच कोटींहून अधिक रुपये खर्ची पडले आहे. विशेष म्हणजे करोना कालावधीत हा खर्च वाढला आहे. यामध्ये आमदार पदावर असलेल्या नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कारणासाठी पैसा खर्ची पडला आहे.
गोंधळेनगर येथील नागरिक तानाजी घोलप यांनी माहिती अधिकारात 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात महापालिकेने नगरसेवक आणि माजी नगरसेवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सहाय्य योजनेतील खर्चाची माहिती मिळवली आहे. या माहितीनुसार नगरसेवकांच्या आरोग्यावर लाखो रुपये खर्ची पडल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे आमदार म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या सवलतीप्रमाणेच काही नगरसेवकांनी महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या विविध समितीचे पदाधिकारी आणि स्थायी समितीसारख्या समितीत सदस्य म्हणून काम करणाऱ्यांचा यात समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2020-21
वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 2 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद केली गेली होती. ही तरतूद खर्ची पडल्यानंतर 1 कोटी 67 लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून दिले गेले. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जमा झालेल्या 419 बिलांपोटी 4 कोटी 36 लाख 84 हजार रुपये खर्ची पडले. यावर्षी सुमारे 35 बिलांची रक्कम एक लाख रुपयाहून अधिक आहे. आजारपणामुळे मरण पावलेल्या दोन नगरसेवकांच्या उपचारासाठी महापालिकेने खर्च केला आहे.
आर्थिक वर्ष 2021-2022
2021-2022 या आर्थिक वर्षासाठी वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली गेली होती. यापैकी सुमारे 1 कोटी 18 लाख रुपये 149 बिलांपोटी खर्ची पडले आहे. याचवर्षी माजी नगरसेवकांसाठी सुमारे 1 कोटी 21 लाख रुपये खर्ची पडले आहेत. तर या आर्थिक वर्षात एक लाखाहून अधिक रक्कम असलेली सुमारे 57 बिले आहेत.
पालिकेच्या खर्चातून खासगी रुग्णालयात उपचार
करोना कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे वैद्यकीय खर्चामुळे गणित बिघडले होते. अशा काळात नागरिकांना सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु नगरसेवकांची बिले पाहता ही शहरातील नामांकित रुग्णालयांची असल्याचे स्पष्ट होत आहे. या वैद्यकीय सहाय्य योजनेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी घोलप यांनी केली आहे.