शिक्षणाचा बाजार ः पालिकेने केवळ नोटिसांचे कागदी घोडे नाचवले
शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीसा पाठविल्यानंतर संस्थाचालक आडमुठेपणा करत असल्यास शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण विभागाला शाळांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अनधिकृत शाळांना नोटीसा पाठवूनही सुरु राहिल्यास एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, एक लाख रुपयांचा दंड आकारुनही शाळा सुरु राहिल्यास दिवसाला दहा हजार रुपयांचा दंडही ठेवण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षी नोटीसा पाठविण्याशिवाय अनधिकृत शाळांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील अनधिकृत खासगी शाळांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये, पिंपरी चिंचवड शहरातील 17 अनधिकृत शाळा होत्या. मात्र, गेल्या वर्षी शहरातील एकाच शाळांवर कारवाई केली असून अद्यापपर्यत 16 अनधिकृत शाळा सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे, महापालिकेने केवळ नोटीस पाठवण्याचे कागदी घोडे नाचवण्याचे काम केले असल्याने अनधिकृत शाळांना कोणतेही भय राहिले नाही.
बेधडकपणे देशाचे भविष्य मानल्या जाणाऱ्या मुलांच्या भविष्यांशी खेळ केला जात आहे. शहरातील खासगी शाळांची यादी महापालिकेतर्फे जाहीर केल्यानंतर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभाग करते. मात्र, काही पालकांपर्यंत ही माहिती पोहचत नसल्याने किंवा इतर अडचणी असल्याने पालक नाईलाजाने प्रवेश घेतात. शहरात 587 खासगी शाळा असून त्यापैकी 16 शाळा अनधिकृत असल्याचे, महापालिकेने सांगितले. या शाळांवर कारवाई करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असूनही विभागाने केवळ नोटीसा पाठवण्यात धन्यता मानली आहे. यामुळे, शिक्षण विभाग शहरातील बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांना अभय देत असल्याचे दिसत आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शहरातील अनधिकृत शाळा
-ग्रॅंट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी
-स्मार्ट स्कूल, मोशी प्राधिकरण
-इंद्रायणी इंग्लिश स्कूल, साई पार्क दिघी
-मास्टर केअर इंग्लिश स्कूल, भोसरी
-ग्रॅंड मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, चिखली
-जयश्री इंग्लिश मिडीयम स्कूल, चऱ्होली
-मरिअम इंग्लिश मिडीयम स्कूल, भोसरी
-ज्ञानराज प्राथमिक स्कूल, कासारवाडी
-बुध्दीस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, कासारवाडी
-सेंट मेरीज ज्यूनिअर प्रायमरी स्कूल, पिंपळे निलख
-शुंभकरोती इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड गांधी पेठ
-एंजल्स प्राथमिक स्कूल, पिंपळे निलख
-मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी
-ब्लू रोज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
-बालगोपाळ माध्यमिक शाळा, पिंपरी
-पर्ल ड्राप स्कूल, पिंपळे निलख
गेल्या वर्षी शहरातील अनधिकृत शाळांना शिक्षण विभागातर्फे नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षात शहरातील अनधिकृत शाळांना नोटीसा पाठवूनही दखल न घेतल्यास कारवाई केली जाणार आहे.
ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका