राजगुरुनगर : पोलिस असल्याची बतावणी करित व पोलिस युनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी तोतया पोलिसाला जेरबंद केले आहे. जयदीप नवीनकुमार शहा (वय २० मुळ गाव.अकोले, जि.अहमदनगर , सध्या रा. चाकण,ता. खेड) असे तोतया पोलिसाचे नाव आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षकअरविंद चौधरी हे मित्राबरोबर गुळाणी घाट येथे फिरायला गेले होते. रस्त्यालगत झाडाखाली बसुन भेळ खात असताना जयदीप नवीनकुमार शहा हा तोतया पोलिस व त्यांचा मित्र हे दोघेजण गुळाणीवरून दुचाकीवरून येत होते. दुचाकी थांबवुन पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी व मित्रांना तोतया पोलिसाने विचारले “तुम्ही इथे काय करता दारू पिता आहे काय, दारू कुठे लपवून ठेवली ते सांगा
तोतया पोलिसाच्या अंगावर ट्राफिक पोलिस युनिफॉर्म परिधान केला असल्याने व त्यावर महाराष्ट्र पोलिस नावाचे जर्कीग व डोक्यात कॅप असल्याने चौधरी यांनी तोतया पोलिसाला विचारले की, तु कुठल्या पोलिस ठाण्यात काम करतो, त्यावर त्यांने सांगितले मी चाकण येथे काम करित आहे. दरम्यान चौधरी यांच्या मित्रांनी तोतया पोलिसाला सागितले हे चौधरी साहेब खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आहेत. यांना ओळखत नाही काय ? त्यावर तोतया पोलिसाने म्हटले “साहेब तुम्ही पण का” असे म्हणून एक सॅल्युट मारून तेथुन पळ काढला. चौधरी यांना तोतया पोलिस असल्याची शंका आल्याने त्यांनी खेड पोलिस ठाण्यात फोन केला.एक तोतया पोलिस खेडच्या दिशेने येत आहे. त्याला ताब्यात घेऊन नक्की पोलिस आहे काय याबाबत चौकशी करा. तात्काळ पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी सापळा रचुन राक्षेवाडी येथील गणपती मंदिरासमोर दुचाकी वर येत असताना तोतया पोलिसाला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवत कसुन चौकशी केली असता पोलिस असल्याची खोटी बतावणी करून पोलिस युनिफॉर्म परिधान करून तोतयागिरी करित असल्याचे सांगितले. शहा हा चाकण ते भोसरी येथे रिक्षा चालविण्याचे काम करत तो पोलिसांचा फॅन असल्याचे सांगतो .त्याने पुणे येथून एक ट्रॉपिक पोलिस गणवेश शिवून घेतला होता. तो परिधान करत फिरत होता. गणवेशावर लावलेली नेमप्लेट सापडली असल्याचे सांगितले. यापुर्वी चाकण परिसरात येथेही दोन रिक्षाचालकांना जास्त प्रवांशी भरता म्हणून त्यांना गुन्हे दाखल करण्यांची धमकी देऊन प्रत्येकी दोनशे रुपये शहा यांने घेतले होते. या सर्व प्रकाराबाबत पोलिस हवालदार कोमल तोताराम सोनुने यांनी खेड पोलिस ठाण्यात शहा यांच्या विरोधात फिर्याद दिली असुन अटक केली आहे.