अमेरिकेची पाकिस्तानला सुचना
वॉशिंग्टन – भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारता विरोधात गरळ ओकताना भारताला चोख प्रत्युत्तर देऊ असे विधान करत शक्य झाल्यास भारतावर हल्ला करु असे विधानही केले होते. यावर अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले असून भारता विरोधात बोलताना जपून बोला अशा सुचना देतानाच आधी आपल्या हद्दीतील दहशतवाद्यांना रोखा असा सल्लाही त्यांना दिला आहे.
काश्मीरबाबत भारताने उचललेल्या पावलांमुळे भांबावलेल्या पाकिस्तानने बुधवारी अनेक देशांच्या नेत्यांशी संवाद साधला. यावेळी इम्रान खान यांनी या मुद्द्यावरुन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी संवाद साधला तसेच सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबतही चर्चा केली होती. यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रीया दिली आहे.
अमेरिकन कॉंग्रेसमधील प्रतिनिधी सभेच्या विदेश प्रकरणांच्या समितीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेज यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी आणि आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारावायांसाठी होऊ देऊ नका तसेच भारतात घुसखोरी देखील होवू देऊ नका.
दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी होणाऱ्या चर्चेस आमचा पाठिंबा – अमेरिका
सध्या कलम 370 वरुन दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी काश्मीरसह इतर समस्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा. त्यासाठी अमेरिका दोन्ही देशांच्या पाठिशी उभी आहे असे विधान अमेरिकन सरकारच्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. त्याच बरोबर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या आम्ही भारत सरकारने काश्मीरच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे काश्मीरवर होणारे दुरोगामी परिणाम आणि नविन प्रादेशिक स्थिती बाबद आम्ही बारकाईने लक्ष देऊन आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.