पिंपरी: शुक्रवारी रात्री आई-वडिलांचे कडाक्याचे भांडण झाले. वडिलांनी आईला मारहाण केली. त्यानंतर पती घराबाहेर निघून गेला. भांडणानंतर रात्री हुंदके देणाऱ्या आईचे डोळे पुसत ती लहानगी आईच्या कुशीत झोपली. सकाळी उठल्यावर तिला आईचा लटकलेला मृतदेह दिसला. यामुळे त्या चिमुकलीने अक्षरशः हंबरडा फोडला. ही ह्रदयद्रावक घटना भोसरी येथे शनिवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली.
प्रज्ञा मनोज भोरे (वय 34, रा. विकासनगर कॉलनी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज याला दारूचे व्यसन होते. तसेच तो काहीही कामधंदा करत नव्हता. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असे.
शुक्रवारी रात्रीही मनोज दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याने प्रज्ञा यांना मारहाण केली. त्यानंतर पती घराबाहेर निघून गेला. आपल्या नशिबाला दोष देत प्रज्ञा या आपल्या सहा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन किचनमध्ये झोपण्यास गेल्या. हुंदके देऊन रडणाऱ्या आईचे डोळे ती सहा वर्षीय मुलगी पुसत होती. आई रडू नको ना, असे म्हणत तिला धीर देत होती. रात्री उशिरा त्या चिमुकलीला झोप लागली.
शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आजीच्या हाकांचा आवाज ऐकून ती चिमुरडी झोपेतून उठली. त्यावेळी तिला आपली आई प्रज्ञा यांचा मृतदेह किचनमध्ये लटकलेला दिसला. यामुळे तिने अक्षरशः हंबरडा फोडला. रडत रडत तिने किचनच्या दरवाजाची कडी उघडली. त्यावेळी आजी आत आली. त्यांनीही हंबरडा फोडल्यावर शेजारील नागरिक जमा झाले. प्रज्ञा यांनी किचनमधील छताच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी प्रज्ञा यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.