बीजिंग: पूर्व चीनमधील झेजियांग प्रांतात तेलाच्या टॅंकरच्या स्फोटात किमान 19 जण मरण पावले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. या स्फोटामध्ये तब्बल 166 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असे वेनलिंग शहराच्या प्रसिद्धी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
हा स्फोट शनिवारी शेन्यांग हाइकू एक्सप्रेस वे जवळच्या खेडेगावामध्ये झाला होता. स्फोटात उडालेला ट्रक महामार्गावरील एका वर्कशॉपवर जाऊन कोसळला. त्यानंतर तिथे आणखी एक दुसरा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे फॅक्टरी वर्कशॉपजवळची काही घरे जमिनदोस्त झाली. या ठिकाणी लागलेली मोठी आग विझवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी शेकडो फायर फायटर्स तैनात केले आहेत. हे मदत आणि बचाव कार्य रविवारी दुपारीही सुरू होते, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
ट्रक वर्कशॉपवर पडल्यानंतर झालेल्या प्रचंड स्फोटात आजूबाजूला उभ्या असलेल्या काही कार आणि अन्य वाहनांनीही पेट घेतला. त्यामुळे आग वेगात पसरली, असेही वृत्तात म्हटले आहे.
चीनमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक आहे. प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी लादलेले असल्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहनांचे अपघात होणे ही नेहमीची बाब आहे. याशिवाय वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्यामुळेही अपघातांचे प्रमाण अधिक आहे.