नवी दिल्ली – या वर्षी एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील 3 हिंदी भाषिक राज्ये आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या विधानसभेच्या निवडणुकांकडे बघितले जाते आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या निवडणुकांना अगदी थोडा कालावधी शिल्लक राहिला आहे.
मात्र अद्याप यापैकी कोणत्याही राज्यातील निवडणुकांची घोषणा झालेली नाही. या सर्व राज्यांमध्ये 2018 च्या नोव्हंबर – डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे आताही याच महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने या पाचही राज्यांमध्ये निवडणुकांची तयारी सुरू आहे.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनुक्रमे 6 आणि 3 जानेवारीपुूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये 14 जानेवारीपूर्वी नवीन सरकार येणे आवश्यक आहे. मध्यप्रदेशच्या विदानसभेची मुदत 6 जानेवारीला, छत्तीसगडची 3 जानेवारीला, तेलंगणची 16, राजस्थानची 14 जानेवारीला आणि मिझोरामच्या विधानसभेची मुदत 17 डिसेंबरला संपते आहे.
त्यामुळे या पाचही राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते. या पाचही राज्यांमध्ये 2018 मध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुकांची घोषणा झाली होती. यातील केवळ छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात आणि उर्वरित चारही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेतले गेले होते.
मध्यप्रदेश आणि मिझोराममधील मतदान एकाच दिवशी तर राजस्थान आणि तेलंगणमधील मतदान एकाच दिवशी गेण्यात आले होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही निवडणूक चालली होती. हेच नियोजन गृहित धरले तर ऑक्टोबरमध्ये निवडणुकांची घोषणा आणि नोव्हेबर-डिसेंबरमध्ये पाचही राज्यांममधील निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.