पुणे – महामेट्रोकडून वनाज ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणीही घेण्यात आली, त्यानंतर सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्यात महामेट्रोकडून हडपसर मार्गाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, हडपसर मेट्रो मार्गाबाबत अद्याप कुठलीही हालचाल मेट्रो प्रशासनाकडून दिसत नाही. हडपसरकडे मेट्रोमार्गाला येणाऱ्या अडचणींचा अडथळा पाहता या कामाला उशीर होत आहे का? अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) एप्रिल 2022 मध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर महामेट्रोकडून हडपसरपर्यंत आणि त्यापुढे लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव आहे. शहरालगतच्या वनाज, कोथरूड, सिंहगड रोड आदी भागात मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची यशस्वी चाचणीही झाली आहे. त्यामुळे हडपसर मेट्रो मार्गाचे काम आज-उद्या सुरू होईल, अशी अपेक्षा असताना यामार्गाबाबत मेट्रोकडून कुठल्याही हालचाली अद्याप दिसत नसल्याची स्थिती आहे.
हडपसरमध्ये मेट्रो आणताना पुणे-सोलापूर महामार्गे स्वारगेट ते हडपसर असा मार्ग प्रस्तावीत असेल तर हडपसरपर्यंत मेट्रो नेणे हे महामेट्रो प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे. स्वारगेट ते हडपसर हा मार्ग विचारात घेता स्वेव्हन लव चौकातील पूल, गोळीबार मैदानातील अरूंद चौक, पुलेगटचा अरूंद चौक, रेसकोर्स मार्ग, फातीमानगर चौक, किर्लोस्कर पूल, मगरपट्टाचा दुजमजली पूल हे मुख्य अडथळे ठरू शकतात.
स्वारगेट ते हडपसर हा मार्ग मुळातच अरूंद असल्याने मेट्रोचे खांब टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गालगतची जागा संपादन करावी लागू शकते. सध्याची गुंतागुंतीची स्थिती पाहता हे शक्य होईल, अशी स्थिती नाही. याच कारणामुळे हडपसर मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सध्या आहे.
बीआरटी बंद…
वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय म्हणून बीआरटी सारखा सक्षम पर्याय प्रशासनाने उपलब्ध केला होता. परंतु, हडपसर ते स्वारगेट या मार्गावर बीआरटी चालू शकली नाही. याउलट बीआरटी साठी स्वतंत्रपणे मार्ग केल्यानंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. त्यामुळे या भागातील राजकीय नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी हा मार्गच बंद केला. बीआरटी सेवा राबविताना अडचणी आल्याने तशाच अडचणी मेट्रोमार्गात येणार की काय? अशी चर्चा नागरिकांत आहे. हा प्रोजक्ट राबविण्यासाठी या मार्गावर मुबलक जागा गरजेची ठरणार आहे.
हडपसर परिसरासह पूर्व हवेलीतील गावांची सार्वजनिक वाहूतक व्यवस्था भक्कम होण्यासाठी येथे मेट्रो असावी, अशीच आमची मागणी आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच प्रशासनाकडे दिलेला आहे. महामेट्रो प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा सुरू असतो.
स्वारगेट ते हडपसर या मार्गाची सध्याची स्थिती पाहता या मार्गावर मेट्रो आणण्यासाठीची जी काही प्रशासकीय तयारी आहे ती करण्यात संबंधीत विभाग, अधिकाऱ्यांना काही कालावधी लागू शकतो. यासाठी प्रशासनास स्थानिक पातळीवर जे काही सहकार्य प्रशासनास हवे आहे ते आम्ही करू. महामेट्रोने याबाबत केंव्हाही चर्चा करावी, असे चेतन तुपे (आमदार, हडपसर) म्हणाले.