अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे तातडीच्या रुग्णांची हेळसांड
केंदूर -येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महिलांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी देखील या आरोग्य केंद्राच्या ग्रामस्थांनी अनेकवेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या; मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही.
महिलांच्या आरोग्यासाठी शासन नवनवीन उपक्रम राबवत आहे; मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाला याचं कसलंच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. आरोग्य केंद्रात रुग्ण वेळेत उपस्थित असतात; मात्र दवाखान्यात ना सर्व कर्मचारी उपस्थित असतात ना डॉक्टर, त्यामुळे एखाद्या आपत्कालीन प्रसंगी त्याचबरोबर गर्भवती महिलांच्या आरोग्यविषयक एखादा प्रसंग उभा राहिला तर प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत मिळेल की नाही, या बाबत आता शंका उपस्थित होत आहे.
शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. किमान प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात 24 तास महिला नर्स कर्मचारी उपस्थित असायला पाहिजे; मात्र दवाखान्यात डॉक्टर उशिरा तर येतातच, त्याचबरोबर दिवसपाळीचे कर्मचारी उपस्थित राहण्याच्या आधीच रात्रपाळीचे कर्मचारी दवाखान्यातून काढता पाय घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सकाळी साडेआठची वेळ असताना एक तास उशीर होऊनदेखील गर्भवती महिलांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मुहूर्त मिळत नाही.
कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
जिल्ह्यातील अनेक रुग्णालयातील जागा रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. तर उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने प्रशासन अशा लोकांवर कारवाई करण्याचे धैर्य दाखवत पर्यायाने अशा अधिकारी, कर्मचारी वर्गाचा अधिक हलगर्जीपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या महिलांनी तरी गांभीर्याने घ्यावे
जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती – उपसभापती, पंचायत समिती सदस्या एवढंच काय केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर देखील महिलाच आहेत; मात्र महिलांच्याच आरोग्याबाबत एवढी उदासिनता का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या याअगोदर देखील अनेक तक्रारी ऐकण्यात आल्या आहेत. आम्ही देखील महिला आहोत आम्ही महिलांच्या अडचणी समजू शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांची दखल न घेणाऱ्या केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याबाबतीत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. त्यामुळे उद्याच आम्ही यासंदर्भात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करणार आहोत.
-मोनिका हरगुडे, सभापती पंचायत समिती शिरूर