कराडला मुख्यमंत्रीपद असताना काय-काय मिळाले?

सांगता सभेत भरपावसात अतुलबाबा भोसलेंची फटकेबाजी

कराड – साडेतीन वर्षे कराडमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद असतानाही कराडला काय मिळाले? या काळात इथे एक तरी नवीन उद्योग आला का? एकाला तरी रोजगार मिळाला का? आज बेरोजगारी वाढली, म्हणून टीका करणाऱ्यांनी स्वत:च्या काळात का रोजगार निर्मिती केली नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे नाव घेणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींना यशवंतरावांच्या समाधी स्थळाजवळची पूर संरक्षक भिंत उभारता आली नाही, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही.

अशी उभ्या पावसात जोरदार फटकेबाजी करीत कराडच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्‍क्‍याने निवडून आणण्यासाठी मतदारराजानी आपले प्रयत्न पणाला लावावेत, असे आवाहन भाजपा-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मोठ्या संख्येने उपस्थित मतदारांना केले.

दत्तचौक येथे आयोजीत भाजपा-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले, मदनराव मोहिते, डॉ सुरेश भोसले, ना. शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, सुहास जगताप, विनायक पावसकर, किरण पाटील, अतुल शिंदे, गजेंद्र कांबळे, महेश कांबळे, नगरसेविका विद्या पावसकर, स्मिता हुलवान, माया भोसले, सुप्रिया खराडे, अरुणा पाटील, अंजली कुंभार, कश्‍मिरा इंगवले, आशा मुळे, महादेव पवार, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रा. मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे भोसले म्हणाले, भाजपाचे सरकार विकासाला प्राधान्य देणारे सरकार असून महायुतीच्या उमेदवारांना मतदान करुन मतदारांनी आपल्या शहराचा, जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी पाठबळ द्यावे. नगरसेवक राजेंद्रसिंह यादव म्हणाले, कराडची ओळख म्हणून स्वत:चे फोटो लावणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, की कराडची ओळख ही आजही नाही, तर हजारो वर्षांपासून हे शहर अस्तित्वात आहे. 2014 साली त्यांना आम्ही मनापासून मदत केली. शहराच्या प्रगतीसाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो होता. पण त्या बदल्यात आम्हाला केवळ द्वेष आणि सुडाचे राजकारण मिळाले. ज्या शहराने त्यांना 2014 साली मताधिक्‍य दिले, त्या कराड शहरावरच हे नांगर फिरवायला निघाले आहेत.

नकट्या विहीरीजवच्या 100 मीटर हवाई अंतराच्या परिसरात त्यांनी तत्कालीन घेतलेल्या निर्णयामुळे या परिसरात सामान्य नागरिकांना बांधकाम करणे शक्‍य नाही. ही अट उठवावी यासाठी आम्ही शंभर वेळा ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे सत्ता होती, पण इच्छाशक्ती नव्हती. त्यांनी निश्‍चित केलेल्या पुररेषेमुळे कराड शहराच्या 60 टक्के भागावर नांगर फिरविण्याचा यांचा डाव आहे. शहर विकास आराखड्यात तर प्रचंड अफरातफर त्यांच्या काळात झाली असून, पूररेषा भट्टड कॉम्प्लेक्‍स-इदगाह मैदानपर्यंत आली आहे.

कोयना दूध कॉलनी, दत्त चौकातील नागझरी नाला, पाटण कॉलनी हा परिसर नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आल्याने या भागाच्या विकासाला खीळ बसली आहे. पण स्वत:चे घर मात्र त्यांनी यामधून सहीसलामत ठेवले आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही 22 नगरसेवक छातीचा कोट करून उभे राहू. या निवडणुकीत उदयनराजे भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार असल्याचे यादव यांनी सांगितले. शेखर चरेगावकर म्हणाले, नरेंद्र मोदींजींच्या प्रचाराच्या झंझावातामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. परंतु त्यांच्या भूलथापांना जनता आता बळी पडणार नाही. यावेळी विक्रम पावसकर, रोहीणी शिंदे, जयवंतराव पाटील, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, प्रा. मच्छिंद्र सकटे, प्रा. अमोल साठे यांची भाषणे झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)