मुंबई – ‘मसान’ चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता ‘विकी कौशल’ सगळ्यांसमोर आला मात्र, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातल्या विकीच्या ‘हाउज द जोश…’ या डायलॉगमुळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाहीतर त्याच्या फॅनफॉलोइंगमध्येही मोठा जोश वाढला. सध्या अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला विकी त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
नुकतंच विकीच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचे शूटींगही पूर्ण झाले असून, तो लवकरच प्रदर्शित करण्याचा विचार सध्या चालू आहे. यासोबतच ‘तख्त’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘मिस्टर लेले’, ‘लुक्का-चुप्पी 2’ सारखे अनेक चित्रपट 2023 साली प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, अश्यातच अभिनेत्याला एक ऐतिहासिक भूमिका सोपवण्यात आली आहे.
विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असून, याबाबत विकीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एका मुलाखतीत अभिनेत्यानं याबद्दल खुलासा केला आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता विकी कौशल जी भूमिका करतो त्यात जीव ओततो. त्याने आजवर अतिशय मोजक्याच भूमिका निभावल्या असल्या तरी त्या कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. आता पुन्हा एकदा विकी कौशल दमदार भूमिकेसाठी सज्ज झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.