विजय सोनवणे
खेड -सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय फेमस होईल याबाबत काय सांगता येत नाही. त्यातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गाजलेला फोन कॉलचा डायलॉग आता गाण्यातून चक्क लग्नाच्या नवरदेवाच्या वरातीत डीजेवर वाजू लागल्याने तरुणाईतून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
खेड (ता. कर्जत) येथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. पण या विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या वरातीत चक्क काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील… ओक्केमधी हाय समदं! हे गाणं वाजू लागल्याने नवरदेवाने थेट डीजेवर चढून आपला आनंद व्यक्त केला. शहाजीबापू पाटील अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले होते. दोन-तीन दिवस “नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन करून माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केले होते.
या फोनकॉलमुळे त्यांच्या या संवादाला जगभरात डोक्यावर घेण्यात आले. या संवादाची अनेक गीते बाहेर पडू लागली आहेत. काही “रॅप सॉंगही’ तयार करण्यात आली आहेत. हा संवाद इतका गाजला आहे की गेल्या दहा दिवसांपासून सोशल माध्यमांवर प्रत्येकजण स्वतःचा झाडीत, हॉटेलात, डोंगराच्या सान्निध्यात असलेला फोटो अपलोड करून त्याला “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’ असे कॅप्शन देऊन धमाल करत आहेत. हा संवाद आता सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता लग्न सोहळ्यात वाजणाऱ्या डीजेच्या गाण्यातही आला आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यातील शूटिंगमध्येही हे गाणे कायमचे कैद होणार आहे.