हडपसर-उरुळी देवाची रस्त्यावर खड्डे ; डबकी साचली
फुरसुंगी – हडपसर-सासवड मार्गावर सत्यपुरम ते उरुळी देवाची पोलीस चौकी दरम्यान रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी जागाच नसल्याने संपूर्ण रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडुन रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहने डूलत डूलत चालत आहेत. तर, पादचाऱ्यांना पायी चालणेही कठीण झाले आहे. पहिल्याच पावसामुळे सर्वत्र खड्डयांमुळे जीवघेणी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांत संतापाची लाट आहे.
हडपसर-सासवड मार्गावर जागोजोगी पाणी साचले आहे. त्यातच रस्त्यावरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळत आहेत. यातून छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. तर खड्डयांमुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.
तासन्तास वाहतूक कोंडी होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. सत्यपुरम, तुकाईदर्शन, भेकराईनगर चौक, विठ्ठल पेट्रोलियम, फुरसुंगी फाटा, रेल्वे उड्डाणपुल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा आदी ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.
पालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.