…आता प्रतीक्षा यादीची

 इच्छुकांना आणखी आठवडाभर वेटिंग

पुणे – आज लागणार, उद्या लागणार याची प्रतीक्षा करत शहरातील विधानसभेच्या इच्छुकांनी गेल्या काही दिवसांत रात्री जागून काढल्या. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याची शक्‍यता असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

अर्ज भरण्याची शेवटची मुदत 4 ऑक्‍टोबर आहे. त्यातच, पितृपंधरावडा 28 सप्टेंबरपर्यंत असल्याने आणखी आठवडाभराच्या रात्री इच्छुकांना जागून काढाव्या लागणार आहेत. शहरात आठही विधानसभा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तर शिवसेना आणि भाजपची युती झालेली असली तरी, भाजपने आठही जागांवर दावा सांगितला असून शिवसेनेकडून प्रत्येकी 4 जागांची मागणी करत शिवाजीनगर, हडपसर, कसबा तसेच वडगावशेरीची मागणी होत आहे. हे जागा वाटप अद्याप निश्‍चित नसल्याने शिवसेनेचे इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत.

तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा 2009 च्या विधानसभेच्या फॉर्म्युल्यावर सुटण्याची शक्‍यता असून दोन्ही पक्ष शहरात प्रत्येकी 4-4 जागा लढविण्याची शक्‍यता आहे. तर मनसेकडूनही कसबा, हडपसर, खडकवासला, कोथरूड या 4 मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्र लढणार आहेत. याशिवाय, युतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपाइंनेही 2 जागांची मागणी केली आहे. तर भाजपकडूनही प्रत्येक विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांसह 2 ते 3 इच्छुकांनीही वरिष्ठ नेत्यांकडे सेटींग लावली आहे.

आचारसंहितेचीही होती उत्सुकता

इच्छुकांचे डोळे गेल्या आठवड्यापासून निवडणूक आचारसंहितेवर लागले होते. निवडणूक घोषणा कधी होणार, निवडणूक दिवाळीत होतील का, दिवाळीनंतर? घोषणेला उशीर झाल्यास आपल्याला प्रचारासाठी काय करावे लागेल याच्या विचारातच इच्छुकांची झोप उडाली होती. तर सोशल मीडियावर पडणारा निवडणुकीसंबंधित मेसेज त्यांच्याकडून चारवेळा तपासून घेतला जात होता. मात्र, आता निवडणूक तारखा माहिती झाल्याने त्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)