स्नायूंचे आजार टाळण्यासाठी आहार, व्यायाम समन्वय आवश्‍यक

डॉ. अमोल रेगे यांचा सल्ला : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यक्रम

पुणे  – नागरिकांनी दैनंदिन जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाचा समन्वय साधल्यास पाठदुखी व कंबरदुखीपासून दूर राहतील. याचबरोबर, शरीरातील स्नायूंचे आजार टाळण्यासाठी शारीरिक हालचाली करताना काळजी घ्यावी, असा सल्ला मणकाविकार तज्ज्ञ डॉ. अमोल रेगे यांनी शनिवारी दिला.

स्वस्थि फिजिओथेरपी क्‍लिनिक आणि भारती सांस्कृतिक मंडळातर्फे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “फिजिओथेरपी’ या विषयावर डॉ. रेगे बोलत होते. यावेळी, स्वस्थि संस्थेच्या प्रमुख डॉ. हिमानी पंडीत, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अमेया कुलकर्णी, मेघना दाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीची कारणे व व्यायामप्रकार चित्रफितीद्वारे दाखवून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे निरसन डॉ. रेगे यांनी केले.

डॉ. रेगे म्हणाले, शरीरातील मणक्‍यात अतिप्रमाणात वेदना झाल्यास इतर उपाय करून आजार बरा केला जातो. मात्र, अद्यापही शरीरातील मणका बदलण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही. भारतात आजारांवर उपचार करणारे तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने विकसित झाल्याने शस्त्रक्रियेबाबत रुग्णांनी गैरसमज दूर करण्याची आवश्‍यकता आहे. याचबरोबर, रुग्णांना हाडांचा ठिसूळपणा दूर करायचा असल्यास सिताफळ, नाचणी, फळे खाणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी वाहन चालविताना, जड वस्तू उचलताना, खुर्चीवर योग्य पद्धतीने बसताना काळजी घ्यावी. अन्यथा, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू होत असल्याचे, त्यांनी सांगितले.

मागील 10 वर्षांत तंत्रज्ञानात बदल झाल्याने शस्त्रक्रिया करताना रुग्णांनी भीती बाळगू नये. याचबरोबर, नागरिकांसाठी जोरात चालणे हा व्यायाम प्रकार महत्त्वाचा असून त्यासाठी शरीराचा कणा ताठ असण्याची गरज आहे. तसेच, बहुतांशी रुग्णांना एका अवयवाचा आजार दुसऱ्या अवयवाशी जोडलेला असतो. शरीरातील प्रत्येक अवयव तंदुरुस्त असण्याची गरज असून शरीराला त्रासदायक ठरणारे व्यायामप्रकार टाळावेत, असेही डॉ. रेगे यांनी सांगितले.

मोबाइलचा वापर कमी प्रमाणात करावा 
सध्याच्या काळात मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सतत मोबाइलवर बोलणे व गेम खेळल्याने मानदुखीचा त्रास सुरू होतो. याचबरोबर, लहान मुलांना मोबाइल देण्याचे टाळावे. लहान वयातच मुलांना मानदुखी, पाठदुखी सुरू झाल्यास घरगुती उपाय न करता डॉक्‍टरांना दाखवावे, असा सल्ला डॉ. रेगे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.