पुणे – वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी रविवारीदेखील चांगला प्रतिसाद दिला. मात्र, दुपारनंतर ठिकठिकाणी बच्चे कंपनी रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत होते. सलग दोन दिवस घरात बसावे लागल्याने काही ठिकाणी नागरिकही पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसत होते. बाजारपेठा, बसस्थानक आणि मुख्य रस्त्यांवर मात्र शुकशुकाट होता. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्या 50 नागरिकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
एप्रिलच्या सुरुवातीलाच करोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्यावर जिल्ह्यात आठवडाभर संचारबंदी व जमावबंदी करण्यात आली होती. तर, राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला. या टाळेबंदीला दोन्ही दिवस पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी शहरात 96 ठिकाणी नाकाबंदी केली होती. यामुळे रस्त्यावर अत्यावश्यक सेवा आणि घरगुती कामागारांव्यतिरिक्त कोणाचाही वावर दिसत नव्हता.
मार्केटयार्ड ठप्प…
शासन आणि प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत मार्केटयार्डातील गुळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, केळी आणि पान बाजार शनिवारी आणि रविवारी बंद होता. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पहायला मिळाला.मांजरी, उत्तमनगर आणि मोशी येथील उपबाजारही बंद होते. गुलटेकडी मार्केटयार्डात फळे व भाजीपाला विभागात किरकोळ आवक वगळता बाजार संपूर्णपणे बंद होता.
दरम्यान, बाजार बंद राहणार की सुरू, याबाबत शुक्रवारी साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर अगोदर निघालेल्या गाड्यांतील शेतमाल खाली उतरुन घेण्याचे ठरल्याने संभ्रम दूर झाला. परिणामी, रविवारी बाजार पूर्ण बंद होता. शहर बंद असणार असल्याने विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ शकते. तसेच मालही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मार्केटयार्डातील सर्व विभाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केला होता.