पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये दररोज 2 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत आहे. सद्यस्थितीत शहरात तब्बल 196 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 297 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. शहरात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
शहरात 25 हजार 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 20 हजार 649 रुग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.
तर 4 हजार 677 रुग्णांवर महापालिका व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या अपुरी असल्याने गंभीर रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयामध्ये 196 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 297 रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच 1379 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे असल्याने त्यांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे.