वैचारिक : प्रश्‍न तंत्रज्ञानाच्या निवडीचा!

– प्रा. डॉ. अश्‍वनी महाजन

रोबोटिक्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आदी तंत्रज्ञानामुळे रोजगारनिर्मितीत घट होईल, हे खरे आहे; परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे खर्चात कपात होईल, हेही आपण विचारात घेतले पाहिजे.

गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत जागतिकीकरणाच्या आंधळ्या शर्यतीत सर्वाधिक नुकसान रोजगार निर्मितीच्या पातळीवर झाले. चीन वगळता जगातील सर्व देशांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर 6.2 टक्‍के आहे, इंग्लंडमध्ये 5.1 टक्‍के, जर्मनीत 5.9 टक्‍के, फ्रान्समध्ये तर बेरोजगारीचा दर 8 ते 9 टक्‍के एवढा आहे. ओईसीडीच्या एका अहवालानुसार, भारतात 2017 मध्ये 15 ते 29 वर्षे वयोगटातील 30 टक्‍के युवक असे होते, जे कोणत्याही शिक्षण संस्थेत नव्हते, रोजगारात नव्हते आणि कसलेच प्रशिक्षणही घेत नव्हते. म्हणजेच 30 टक्‍के युवक पूर्णपणे बेरोजगार होते.

युरोपातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीचा दर 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाला आहे. विकसित देश असो वा विकसनशील, गेल्या 30 वर्षांत सर्वच देश रोजगार कमतरतेच्या समस्येशी झुंजत आहेत. भारताच्या लोकसंख्येत सुमारे दोन कोटी लोकांची दरवर्षी भर पडते. आजमितीस भारतात लोकसंख्येचा मोठा हिस्सा तरुणवर्ग हाच आहे. देशातील दोन तृतीयांश लोकसंख्या 35 वर्षांच्या खालील युवकांची आहे. त्यापैकी 36 टक्‍के लोकसंख्या 15 ते 35 वयोगटातील आहे. या दृष्टीने जगात सर्वाधिक युवक भारतात आहेत.

या परिस्थितीकडे “लोकसंख्यात्मक फायद्याची स्थिती’ म्हणून पाहिले जाते, कारण युवा लोकसंख्येच्या ऊर्जेचा वापर करून देश वेगाने प्रगती साधू शकतो. या लोकसंख्यात्मक लाभाच्या स्थितीचा फायदा कसा घ्यावा, याची चिंता धोरणकर्त्यांना लागलेली असते. गेल्या 20 वर्षांत चिनी वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर आयातीमुळे देश उत्पादन क्षेत्रात पिछाडीवर पडला. त्याचा परिणाम रोजगारनिर्मितीवरही झाला आहे. नवीन तंत्रज्ञान आज बेरोजगारीच्या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे. पूर्वीही यांत्रिकीकरणामुळे रोजगारावर परिणाम झाला होता. नंतर या समस्येचे निराकरण करण्यासाठी हळूहळू रोजगाराचे अन्य पर्याय शोधून काढण्यात आले होते. उत्पादन क्षेत्रात रोजगार घटला, तर त्याची भरपाई सेवा क्षेत्रातून होऊ लागली. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्‍स, ब्लॉक चेन आदी नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधींवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.

पूर्वी कॉल सेंटरच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत होती. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कॉल सेंटरमध्ये युवकांच्या ऐवजी इंटरनेट बॉट्‌स यंत्रे (छोटे यंत्रमानव) परस्परांशी संवाद साधतात. त्यामुळे रोजगार घटू लागला आहे आणि येणाऱ्या काळात तो आणखी घटणार आहे. आजकाल कारखाने, कार्यालये आणि घरांमध्येही माणसाचे काम यंत्रमानव करू लागले आहेत. पहिल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात यांत्रिकीकरणामुळे रोजगार घटला होता. हीच बाब दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळातही कायम राहिली. अर्थात, यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक उद्योगांमध्ये रोजगार कमी झाला असला, तरी त्यामुळे पर्यायी रोजगारांची निर्मितीही झाली.

वस्तुतः तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळातच माहिती तंत्रज्ञानाचे बिगूल वाजले होते. परंतु भारत या क्रांतीपासून जवळजवळ पूर्णपणे दूर राहिला. कारण संगणक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात भारत उर्वरित जगापेक्षा खूपच मागे राहिला होता. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये भारत मर्यादित स्वरूपातच रोजगारनिर्मिती करू शकला. भारताला दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत झालेल्या पिछेहाटीची भरपाई करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर चौथ्या औद्योगिक क्रांतीत हिरीरीने भाग घ्यावा लागणार.

उदाहरणार्थ, ज्या कंपन्या आज रोबोटिक्‍स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्यांचा उत्पादनखर्च कमी होत आहे. खर्च कमी झाल्यामुळे संबंधित उद्योग बाजारपेठेत स्पर्धात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होतो. परंतु तरीही नव्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली रोजगाराचा अंधाधुंद ऱ्हास उचित ठरवता येऊ शकत नाही. अशा स्थितीत धोरणकर्त्यांना तंत्रज्ञानाच्या निवडीच्या बाबतीत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. योग्य तंत्रज्ञानाच्या निवडीचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या युगात ही निवड बाजारपेठेच्या दबावाखाली केली जाते. जिथे-जिथे रोबोटिक्‍स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे उत्पादनखर्च घटतो, त्या-त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान समर्थनीय मानले जाते. परंतु रोजगार घटण्यामुळे आपल्याला एक “सामाजिक किंमत’ (सोशल कॉस्ट) मोजावी लागते, हेदेखील आपण विसरता कामा नये.

ज्यावेळी लोक रोजगाराच्या साधनांपासून दूर फेकले जातात, त्यावेळी त्यांची ऊर्जा आणि कौशल्याचा उपयोग होत नाही. त्यांच्या घटलेल्या उत्पन्नाची भरपाई करण्यासाठी सरकारला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खर्च करावाच लागतो. म्हणजेच एकीकडे कंपन्यांचा उत्पादनखर्च घटत जातो, तर दुसरीकडे समाज आणि सरकारवर त्याचा बोजा पडतो. म्हणूनच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्‍यक आहे. ज्यामुळे लोकांना अनावश्‍यक कष्ट पडणार नाहीत आणि संसाधनांचा वापरही पूर्णपणे होईल, असे तंत्रज्ञान निवडावे लागणार आहे.

आज ही चर्चा आहे, एकीकडे देश या क्षेत्रांत जगात अग्रेसर बनू शकेल आणि दुसरीकडे उपयुक्‍त तंत्रज्ञानाची निवड करून देश सर्व प्रकारच्या युवकांना रोजगार देऊ शकेल; मग ते युवक कुशल असोत वा अकुशल असोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.