न्यूयॉर्क : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू आहे. त्यातच काबूल विमानतळ दोन स्फोटांनी हादरल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा पारा चढला आहे. तसेच त्यांनी इसिसशी संलग्न असणाऱ्या दहशतवादी संघटनेला आव्हान दिले आहे.
असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिलाय. व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले आहेत. “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असे बायडेन म्हणालेत.
काबूलमधील हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. “हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,” असं बायडेन यांनी हा हल्ला घडवून आणणाऱ्यांबद्दल बोलताना सांगितले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर अमेरिका त्यांच्या नागरिकांबरोबरच इतरांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं आहे. हे काम ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. एक हजार अमेरिकन नागरिक आणि शेकडोच्या संख्येने अफगाणि नागरिक देशाबाहेर पडण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत.
देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ एक असे दोन आत्मघाती स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. तसेच तालिबानने हा हल्ला अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या भागात झाला असून याचा आम्ही निषेध करत असल्याचे म्हटले.