मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही वक्तव्य करत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. यामध्ये केसरकर यांनी नारायण राणे यांच्या नावाचा देखील उल्लेख करत काही घडामोडी सांगितल्या होत्या. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत केसरकारांवर निशाणा साधला होता. आता पुन्हा माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकारांना लक्ष केलं आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. अशात सर्वच आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यात दीपक केसरकरांनी केलेल्या खुलाश्यानंतर राणे केसरकर असा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. अशात निलेश राणे यांनी केसरकारांबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणतात, “दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे”.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
राज्याच्या मंत्रिमंडळात नितेश राणे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटनंतर आता केसरकर विरुद्ध राणे असा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.