HSC Exam 2024 – काॅपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेच्या वातावरणात राज्यात बुधवारपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षा केंद्रावरही जय्यत तयारी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्याबाबतचे आकर्षक फलकही लावण्यात आले होते. पाल्यास परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनीही गर्दीही केलेली होती. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. यात राज्यात काॅपी आणि संबंधित गैरप्रकाराची 58 प्रकरणे समोर आली.
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेच्या दीड तास आधीपासून आधी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात येत होत्या. विद्यार्थ्यांचे परीक्षेबाबतचे दडपणही कमी करण्यासाठी करण्याला प्राधान्य देण्यात आले.
पथकेही तैनात तरी कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर
इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी भरारी पथकासह अन्य पथकेही तैनात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुन त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. असे असतानाही राज्यात इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याची 58 प्रकरणे सापडली. यातील पुण्यात 15, नाशिक -2, लातूर – 14 नागपूर – 1 आणि छ. संभाजीनगर मध्ये 26 विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले आहे.
परीक्षा केंद्राच्या बिल्डिंगवर चढून काही जण कॉपी पुरवत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. तर काही ठिकाणी वेगवेगळी शक्कल लढवत परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनाकॉपी पुरवत असल्याचे समोर आले. मात्र आता बारावीच्या परीक्षेत कुठलाही परीक्षार्थी कॉपी करताना दिसल्यास त्याच्यावर अॅक्शन घेतली जाणार आहे. तसेच कॉपी करण्यास मदत करणाऱ्यावर देखील कडक कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.