लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी जन्माष्टमीनिमित्त हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. ज्या-ज्या वेळी आपल्यावर संकटे येतात त्या-त्या वेळी भगवद्गीतेमधून आपल्याला उर्जा मिळत असल्याचे ऋषी सुनक यांनी सांगितले आहे.
ऋषी सुनक यांनी खासदारपदाची शपथ ही गीतेवर हात ठेऊन घेतली होती. तसेच ते दर रविवारी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात. ऋषी सुनक यांनी हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती होत्या. यावेळी त्यांनी गोमातेचे पूजन केले. अक्षता मूर्ती या इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत.
हर्टफोर्डशायरमध्ये इस्कॉनचे भक्तीवेदांत मंदिर असून ते 78 एकर जागेवर पसरले आहे. या परिसरात सुंदर बाग आहे. तसेच मंदिराच्या या परिसरात गोशाळाही आहे. श्रीकृष्ण जन्माष्ठमीनिमित्ताने या मंदिरात दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इस्कॉन मंदिराच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, ऋषी सुनक यांनी मंदिराला दिलेल्या भेटीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जन्माष्टमीच्या काळात सुमारे 1500 स्वयंसेवकांनी या काळात परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.