Stock Market Closing updates : सोमवारच्या नेत्रदीपक वाढीनंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची निराशा झाली. मंगळवार हा दिवस अत्यंत अशुभ ठरला आहे. ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 802 अंकांच्या घसरणीसह 71,139 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 215 अंकांच्या घसरणीसह 21,522 अंकांवर बंद झाला. दरम्यान, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आज मंगळवारी शेअरबाजारात जोरदार नफाबुकिंग पाहायला मिळाले.
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 375.38 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या सत्रात 377.13 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.75 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.