Nikhil Wagle : पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” या विषयावर कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान होणार होते.मात्र यावेळी निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल होत असताना त्यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर राजकीय वर्तुळातून या प्रकाराबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. अशात एका राजकीय नेत्याने देखील या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाला भाजपचा विरोध होता. निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत वागळे ठाम होते. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला देखील झाला. सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी निखिल वागळे यांना समर्थन दिले आहे.
विश्वजित कदम यांनी ऍड असीम सरोदे यांची भेट घेत आपण सोबत असल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणी आम्ही विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे देखील यावेळी कदम यांनी सांगितल्याचे समजते.
नेमकं काय झालं होत त्यावेळी ?
कार्यक्रमाला येण्यासाठी निघालेल्या निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या अंगावर देखील शाईफेक करण्यात आली.