Nikhil Wagle Attack : पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमाला भाजपचा विरोध होता.
निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र निखिल वागळे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत वागळे ठाम होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्रकार निखिल वागळे येत होते.
यावेळी त्यांच्या गाडीवर आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेत गाडीची तोडफोड करण्यात आली असून गाडीवर शाईफेकही केली. दांडेकर पूल चौकामध्ये देखील निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत झालेल्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.
मराठी कलाकारांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून कलाकारांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. मराठी अभिनेत्री वीणा जामकर हिने फेसबुकवर पोस्ट शेअर केली असून, ‘निखिल वागळे, चौधरी सर, आणि असीम सरोदे ह्यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध..!! असं म्हंटल आहे.
अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. “हमीं पे हमला करके, हमीं को हमलावर बताना…सब याद रखा जाएगा, सबकुछ याद रखा जाएगा ! या कवितेच्या काही ओळी माने यांनी पोस्ट केल्या आहेत.
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे याने देखील हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याने म्हटले की, “जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो. पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली…काळजी घ्या..निखिल वागळे’ असं हेमंत ढोमे याने म्हंटल.
जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो! पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली!
तुमच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेघ आणि पुढच्या सर्व सभांसाठी शुभेच्छा!
काळजी घ्या! @waglenikhil https://t.co/5PrhlDvpF3
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) February 10, 2024