सातारा -“आमचे निकटवर्ती मित्र कै. दीपक आहेरराव यांची सुकन्या गायत्री दीपक आहेरराव हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या. भूतकाळातील घटना वेगाने डोळ्यासमोर तरळून गेल्या. आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ठ ऋणानुबंध आहे. ज्योती वहिनींना हे दुःख सावरण्याचे बळ परमेश्वर देवो. त्यांनी अत्यंत कष्टातून मुलांना मोठे करून आपल्या पायावर उभे केले होते. त्यांच्यासाठी आज काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही. आम्ही निशब्द आहोत. तिच्या दुर्दैवी मृत्यूची सल आमच्या मनात कायम असेल,’ अशा भावनिक शब्दांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेने आज अनेक सातारकरांनीही यवतेश्वर परिसरात झालेल्या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली.
यवतेश्वर परिसरामध्ये दोन वाहनांच्या अपघातात सातारा पालिकेची तरुण कर्मचारी गायत्री दीपक आहेरराव हिचा मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर आपली भावनिक प्रतिक्रिया पोस्ट केली. गायत्रीचे वडील दीपक आहेरराव हे खासदार उदयनराजे यांचे जवळचे मित्र होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दीपक यांच्या पत्नी ज्योती आहेरराव यांनी मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा हाकला. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. मात्र नियतीच्या खेळासमोर त्यांना हात टेकावे लागले.
गायत्री ही तीन वर्षांपूर्वी सातारा पालिकेच्या सेवेत रुजू झाली होती. अंतर्गत लेखापरीक्षण विभागामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सक्रिय होती. तिच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांमधूनही हळहळ व्यक्त केली गेली. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सुद्धा या अपघाती मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. या घटनेने आहेरराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, पण या प्रसंगातून सावरण्याचे बळ या कुटूंबाला मिळो, अशी सद्भावनाही अनेकांनी यावेळी व्यक्त केली.