दहिवडी – ध्येय गाठण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही, हे माण तालुक्यातील काजल गोसावीने सिद्ध करून दाखविले आहे. दहिवडी येथील सामान्य कुटुंबातील कन्या काजल शेखर गोसावी आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असणाऱ्या नृत्याच्या रियालिटी शोच्या महामंचावर पोहचली आहे.
काजलची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून तिचे वडील शंकर गोसावी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करतात. आई सौ. विजया गोसावी घर सांभाळत शेळीपालन करतात. काजलच्या वडिलांना असणारी लावणीची आवड त्यांनी काजलमध्ये रुजवली. काजलने साधारण दहाव्या वर्षीच एका नृत्यस्पर्धेत टॅलेंटची झलक दाखवली होती. यानंतर तिच्या मनातही नृत्याविषयी ओढ निर्माण झाली. नंतर तिने मागे वळून पहिलेच नाही.
तिने अनेक स्पर्धा जिंकल्या. स्वाभिमानी काजल आपला सर्व खर्च यामधून करून वडिलांना हातभार लावायची. प्रवास करताना कुठेही स्पर्धा असो तिचे वडील तिला आपल्या मोटारसायकलवरुन तिथे पोहचवत असत. काजलच्या आईही तिला एक मैत्रीण म्हणून प्रोत्साहन द्यायच्या. काजल उत्तम अभिनयही करते. आतापर्यंत बऱ्याच लघुपट व अल्बममध्ये तिने काम केले आहे. शॉर्ट फिल्म व एका डॉक्युमेंट्रीमध्ये काजल दिसली आहे.आता या नृत्याच्या शोमध्ये काजलने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
प्रत्येक आई वडिलांना हेवा वाटावा अशी..!
प्रत्येक आई वडिलांना हेवा वाटावा अशी माझी मुलगी काजल. लहानपासूनच तिने कधीच कोणत्या गोष्टीच हट्ट केला नाही. याउलट घरासाठी हातभार लागेल यासाठीच ती नेहमी प्रयत्न करायची. – शंकर गोसावी (काजलचे वडील)