नगर- मागील तीन वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असतांना भाजपच्या आमदारांबाबत निधीसाठी सुडाचे राजकारण त्यांनी केले. मात्र पालकमंत्र्यांनी असे राजकारण न करता जिल्ह्यातील सर्व आमदारांना समप्रमाणात निधीचे वाटप केल्याचा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
मागील तीन वर्ष महाविकास आघाडीने भाजपच्या आमदारांना किती निधी दिला. त्याचे लेखी माझ्याकडे आहे. या तीन वर्षात भाजप आमदारांना दोन अंकीच निधी मिळत होता. तो आता महाविकास आघाडीच्या आमदारांना भाजपच्या काळात तीन अंकी निधी देत आहोत. तीन वर्ष भाजप आमदारांना निधी नसल्यामुळे विकास कामे करता आली नाही.
मात्र आता पालकमंत्री असे सुडाचे राजकारण करीत नाही. ते सर्वांना समान निधीचे वाटप करीत आहे. शिर्डीला दुप्पट निधी दिल्याचा आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुरावा द्यावा. आम्ही देखील सर्वांना समान निधी वाटप केल्याचा पुरावा देण्यास तयार असल्याचे आव्हान खा. विखे यांनी आ. थोरात यांना दिले.
जिल्ह्यातील कायदा व सुवस्थेच्या प्रश्नांवर खा. डॉ. विखे म्हणाले की, राज्याचे गृहखाते अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी प्रयत्नशिल आहे. त्यानुसार हे खाते आता अद्ययावत होत असून नगर जिल्ह्यास देखील 70 मोटारसायकली, 30 चारचाकी वाहने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात या खात्यामार्फत गुन्हेगारीवर बऱ्यापैकी अंकुश ठेवण्याचे काम होणार आहे.